Logo
ताज्या बातम्या

विविध सुविधांचे राज्याचे महिला धोरण जाहीर

मागील तीन वर्षांपासून रखडलेले राज्याचे चौथे महिला धोरण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले. सह्याद्री विश्रामगृहात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमात हे धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणात महिलांसाठी अष्टसूत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे. या महिला धोरणाचा मसुदा तीनवेळा बदलण्यात आला. आता अष्टसूत्रीच्या माध्यमातून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. राज्यातील दुर्लक्षित, दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेणे. तसेच कर्करोग, मूत्रमार्ग संक्रमण, क्षयरोग, रजोनिवृत्तीच्या समस्या इत्यादींसाठी निदान आणि उपचार सुविधा उपलब्ध, महिलांची संख्या जास्त असलेल्या आस्थापनांच्या ठिकाणी पाळणाघर, आदिवासी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष, सर्व पोलिस मुख्यालयांमध्ये भरोसा कक्ष स्थापन करण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे. महापालिका/नगरपालिका प्रभागांमध्ये महिला बचत गटांना स्टॉलसाठी जागा, ऊसतोडणी करणार्‍या महिलांसाठी वसतिगृहे, मुली आणि महिला खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य आणि अनुषंगिक पाठबळ देण्यासाठी विशेष क्रीडा धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. हे धोरण महिलास्नेही असून, महिलांच्या सर्वांगीण विकासाचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरण आणि महिला सशक्तीकरणासाठीही या धोरणामध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे, असा दावा तटकरे यांनी केला.