Logo
ताज्या बातम्या

काँग्रेसचे सरकार आल्यास 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार! राहुल गांधींची घोषणा

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला आहे. CWC म्हणजेच काँग्रेस कार्यकारिणीने मंजूर केल्यानंतर येत्या काही दिवसांत तो प्रसिद्ध केला जाईल. काँग्रेस कार्यकारिणीशी संबंधित एका सूत्राने प्रस्तावित जाहीरनाम्याच्या ब्लू प्रिंटची माहिती दिली. यामध्ये रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोठे विधान करत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास तरुणांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलेल असे म्हटले. भारतात 30 लाख सरकारी पदे रिक्त आहेत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ती भरत नाहीत. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही या 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार आहोत,’ असे जाहीर करून आपली पुढची दिशा स्पष्ट केली. युवा मतदारांना आपल्याकडे वळवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून काँग्रेसने सरकारी नोकरीतील 30 लाख रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ‘महाविद्यालयीन शिक्षणानंतर प्रत्येकाला एक लाख रुपयांचा हक्क’ राहुल गांधी म्हणाले की, ‘आमच्या जाहीरनाम्यात आम्ही एमएसपीसाठी कायदेशीर हमी दिली आहे. तसेच केंद्रात सरकार आल्यास 30 लाख सरकारी नोकऱ्या देऊ. दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक हे भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे 90% आहेत. पण, संस्था आणि बजेट पाहिल्यास या लोकांचा सहभाग नसल्याचे दिसते. देशातील प्रत्येक पदवीधराला एक लाख रुपयांचा हक्क दिला जाईल. आम्ही मनरेगा योजना आणली होती, ज्याचा लाखो लोकांना फायदा झाला. आम्ही रोजगाराचा अधिकार दिला. त्याचप्रमाणे आम्ही भारतातील सर्व तरुणांना अप्रेंटिसशिप शिक्षणाचा अधिकार देणार आहोत. प्रत्येक पदवीधर आणि पदविकाधारकाला हे मिळेल. प्रत्येक तरुणाला महाविद्यालयानंतर लगेचच 1 वर्षासाठी अप्रेंटिसशिप उमेदवारी दिली जाईल आणि त्याला 1 लाख रुपये दिले जातील आणि हा अधिकार असेल.’ काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी दरमहा 6000 रुपये आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 33% आरक्षणाचा उल्लेख आहे. ओबीसी व्होट बँकेचा फायदा घेण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचे आणि मागासलेल्या जातींसाठी आरक्षण मर्यादा वाढवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, दुसरी गोष्ट म्हणजे मनरेगाचे अधिकार आम्ही दिले होते. त्याचप्रमाणे आम्ही भारतातील सर्व तरुणांना शिकाऊ अप्रेंटिसशिपचा अधिकार देणार आहोत. प्रत्येक पदवीधर तरुणाला हा अधिकार मिळेल. कॉलेज डिप्लोमानंतर प्रत्येक पदवीधराला सरकारी कार्यालय आणि खासगी कंपनीत एक वर्षाची अप्रेंटिसशिप आणि त्यासोबत एक लाख रुपये दिले जातील. कॉलेज पूर्ण केल्यानंतर तात्काळ हा हक्क मनरेगाच्या हक्कासारखा मिळेल. काँग्रेसची आश्वासने… 1. भरतीचे आश्वासन: सत्ता आल्यानंतर काँग्रेस पक्ष केंद्रात 30 लाख नोकऱ्या देणार. आम्ही एक कॅलेंडर जारी करू आणि त्यानुसार भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करू. 2. पहिली नोकरी पक्की: प्रत्येक डिप्लोमा किंवा पदवीधरांना सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील कंपनीत एक वर्ष अप्रेंटसशिप दिली जाईल. यासोबतच, 1 लाख रुपये (₹8,500/महिना) मिळेल. 3. पेपर लीकपासून स्वातंत्र्य: सार्वजनिक परीक्षांमध्ये पेपर लीक टाळण्यासाठी आणि निष्पक्ष परीक्षा घेण्यासाठी नवीन कायदा केला जाईल. याद्वारे कोट्यवधी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून रोखले जाईल. 4. गिग इकॉनॉमीमधील सामाजिक सुरक्षा: काँग्रेस गिग इकॉनॉमीमध्ये दरवर्षी रोजगार शोधणाऱ्या लाखो तरुणांसाठी चांगल्या कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. 5. युवा रोशनी: काँग्रेस पाच वर्षांच्या कालावधीसाठी देशातील सर्व जिल्ह्यांसाठी 5,000 कोटी रुपयांचा निधी तयार करेल. 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण कोणत्याही क्षेत्रातील त्यांच्या स्टार्ट-अपसाठी हा निधी मिळवण्यास पात्र असतील.