अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माणाधीन असलेल्या भव्य राममंदिराची वास्तूरचना आता पूर्ण होत आली आहे. सध्या रामलल्लाची मूर्ती तात्पुरत्या मंदिरात स्थानापन्न करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वहस्ते ही मूर्ती जुन्या तात्पुरत्या मंदिरातून नूतन भव्य राममंदिरात घेऊन जाण्याची शक्यता आहे.
22 जानेवारी 2024 या दिवशी नूतन भव्य राममंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी ते स्वत:च्या हाताने ही मूर्ती जुन्या मंदिरातून नव्या स्थानी घेऊन जातील, अशी योजना करण्यात आली आहे. तात्पुरते राममंदिर नूतन राममंदिरापासून साधारणत: 500 मीटर अंतरावर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
11.30 ते 12.30 हा समय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारा हा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 22 जानेवारीला सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबारा असा एक तास चालणार आहे. या कार्यक्रमाचे पौरोहित्य करण्यासाठी भारताच्या विविध भागांमधून पुरोहितांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रार्थना आणि पूजाअर्चा झाल्यानंतर जुन्या मंदिरातील रामलल्लाची मूर्ती नूतन भव्य मंदिरात आणण्यात येईल आणि तेथे तिची विधीवत स्थापना करण्यात येईल. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल.
चल आणि अचल मूर्ती
नूतन मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या ‘चल’ आणि ‘अचल’ अशा दोन मूर्ती स्थापित करण्यात येणार आहेत. जुन्या मंदिरातील मूर्ती ही ‘चल’ आहे, तर सध्या घडविण्यात येत असलेली भव्य मूर्ती ही ‘अचल’ मानण्यात आली आहे. दैनंदिन पूजाअर्चा चल मूर्तीची करण्यात येणार आहे. तर अचल मूर्ती ही भक्तांच्या दर्शनसाठी असेल, असेही रामजन्मभूमी न्यासाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
तीन मूर्तींमधून होणार निवड
न्यासाने तीन भव्य राममूर्तींचे निर्माण कार्य हाती घेतले आहे. तीन भिन्न भिन्न मूर्तीकारांना या मूर्ती घडविण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्यामधून एका मूर्तीची निवड करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप ही निवड निश्चित झालेली नाही. योग्य वेळी ती करण्यात येईल. उर्वरित दोन मूर्ती याच राममंदिरात अन्यत्र स्थापन केल्या जाण्याची शक्यता आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
सोहळा प्रदीर्घ काळ चालणार
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुख्य भाग 22 जानेवारीला होणार असला तरी या प्रक्रियेचा प्रारंभ याआधी कित्येक दिवस केला जाणार आहे. मकरसक्रांतीनंतर त्वरित ही प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. अनुष्ठाने आणि पूजाअर्चा नित्य होणार आहेत. प्राणप्रतिष्ठेआधी राममूर्तींना शरयू नदी तसेच भारतातील अन्य महत्त्वाच्या नद्यांच्या जलाने स्नान घालण्यात येईल. त्यानंतर त्यांची शोभायात्रा अयोध्येच्या मुख्य मार्गावरुन काढण्यात येईल, असाही कार्यक्रम स्पष्ट करण्यात आला आहे.