Logo
राजकारण

जेवढ्या जागा शिंदेंना तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात; भुजबळांनी स्पष्टच सांगितले

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला (NCP) नेमक्या कोणत्या जागा देण्यात येणार आहेत, यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अमित शाह (Amit Shah) यांची मुंबीत चर्चा सुरु आहे. अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेवढ्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला असणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात, असे भुजबळ म्हणाले आहेत. अमित शाह यांची जागावाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरू आहे. यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, "दोन दिवस आमच्या बैठक घेण्यात आल्या. मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते. तसेच, जितक्या जागा शिंदे यांना दिल्या जातील, तितक्याच जागा आम्हाला हव्या आहेत. आमचे वरिष्ठ यावर प्रयत्न करत असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. 'या' जागांवर राष्ट्रवादीचा दावा... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती, रायगड, शिरूर, सातारा, परभणी, गडचिरोली, धारशिव, दिंडोरी किंवा नाशिक, बुलढाणा या जागांवर अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत दावा सांगणार आहे. त्यामुळे या बैठकीत अंतिम कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या जागावाटपाचा अंतीम निर्णय आजच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम दरम्यान जागावाटपावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, "काल आणि आज या दोन दिवसांत 15 ते 16 लोकसभा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी कालपासून आमच्या बैठका सुरु होत्या. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री या बैठकीत उपस्थित होतो. कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिका समजून घेतल्या आहेत. दरम्यान, या क्षणाला देखील आमच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्याची पूर्वीतयारी म्हणून आमचा अभ्यास सुरु होता. तसेच पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम आम्ही केले आहे. तसेच जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यावर आणखी जोमाने कामाला लागणार असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत.