Logo
राजकारण

सरकारचं शिष्टमंडळ भेटीला; आंदोलन मागे घेणार? जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याहून मुंबईकडे कूच करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा लोणावळ्यात पोहोचला आहे. कुठे पदयात्रा तर कुठे वाहनांनी प्रवास करत मनोज जरांगे पाटील सरकारला घेरण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत. हजारो आंदोलकांसह जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले तर सरकारची मोठी कोंडी होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं आहे. मात्र आधी मी समाजाशी चर्चा करणार आणि मग शिष्टमंडळाने नव्याने आणलेल्या प्रस्तावावर चर्चा करेन, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. "आम्हाला आरक्षण हवं आहे आणि ते मिळाल्यावर आम्ही पुन्हा घरी जाऊ. मग ते बीडमध्ये मिळू, पुण्यात मिळू, लोणावळ्यात मिळू की वाशीला मिळू. आम्ही काय मुंबईत कायमचं राहायला चाललेलो नाहीत. आरक्षण मिळालं की आम्ही माघारी जाऊ," असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. मात्र तपासून बघू, निर्णय घेऊ अशी भाषा शिष्टमंडळाची असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. रात्रीच्या सभेला सकाळी सुरुवात मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री 8.30 वाजता होणार होता. मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल 10 तासाहून अधिक वेळ लागल्याने त्यांना मुक्काम व सभा स्थळी पोहचण्यासाठी सकाळचे 6.45 वाजले. सकाळी 6 वाजता जरांगे पाटील मावळच्या भूमीत दाखल झाले. त्यानंतर आता त्यांच्या सभेला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी अनेक नागरिक शेकोट्या पेटवून बसले होते. याविषयी पहाटे चार वाजता त्यांच्याशी संवाद साधला असता आमच्या मुला बाळांना आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आमचा मनोज दादा रात्रंदिवस जागा असताना आम्हाला झोप कशी येणार अशी बोलकी प्रतिक्रिया सभास्थळी असलेल्या लोकांनी दिली. दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाने आणलेला नवा प्रस्ताव मनोज जरांगेंना मान्य होणार का आणि ते आपलं आंदोलन मागे घेणार का, हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.