जर्मन भाषा येणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी राज्य सरकारने जर्मन सरकारसोबत करार केला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२) दिली. बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, राज्यातील रोजगार मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रोजगार मेळावा बारामतीत आज होत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. तरुणांच्या रोजगारासाठी शासन निधी देत आहे. त्यातून अनेक संधी मिळण्यास फायदा होणार आहे.
बारामतीतील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली होती. बसस्थानक छोटे होते. परंतु त्यासाठी ५३ गुंठे जमीन देण्यासाठी अनेक जणांनी मदत केली. त्यामुळे महाराष्ट्रातील एक नंबरचे बसस्थानक बारामतीत उभारता आले. बारामतीत अनेक विकास कामे पूर्ण केली आहेत. प्रत्येक कामाला मी ४० वेळा भेटी दिल्या आहेत. त्यामुळे दर्जेदार कामे होण्यास मदत झाली आहे. अनेक वास्तू सरकारच्या मदतीतून उभारल्या आहेत. बारामतीला महाराष्ट्रातील नंबर एकचा तालुका बनवील, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मदत घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले की, बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. तरुणांना रोजगार मिळवून देणाऱ्या सरकारला धन्यवाद देत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून बारामतीतील अनेक तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. नव्या पिढीला रोजगार मिळण्याची गरज असून असे मेळावे उपयुक्त ठरणार आहेत.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, निलम गोऱ्हे, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.