दिवाळीत प्रत्येकाचे घर विद्युत रोषणाईने व रंगीबेरंगी आकाश कंदीलमुळे उजळते. या दिवाळीचे आकर्षण म्हणून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व नैसर्गिक स्त्रोताचा वापर करीत सौरऊर्जेवर चालणारे शोभेचे रोपटे व ‘वेस्ट टू बेस्ट’ या थीमचा आधार घेऊन रद्दीपासून आकर्षक असे चांद्रयानाचे छायाचित्र असलेले पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवले आहेत.
डीकेटीईमधील एआयसीटीई आयडिया लॅबमध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवरील शोभेचे रोपटे, ‘सोलारवाली दिवाळी’ या उपक्रमांतर्गत सौर उर्जेवरील साहित्य बनवले आहे. ते कुंडीतील रोपट्यासारखे दिसते. त्यावर सौरऊर्जेच्या रोषणाईमुळे आकर्षकपणा आला आहे. याच्यासाठी इकोफ्रेंडली साहित्यांचा वापर केलेला आहे. हे आठ तास उन्हामध्ये ठेवल्यास एक ते दोन दिवस स्वयंचलित प्रज्वलीत होतात.
याशिवाय ‘वेस्ट टू बेस्ट’ या थीमखाली रद्दीपासून अत्यंत सुबक असे आकाश कंदील बनवले आहेत. यामध्ये चांद्रयान व छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्रे साकारली आहेत. हे सर्व साहित्य पूर्णपणे पारंपरिक असून, स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून बनवलेले आहे. तुलनेने सर्वसामान्यांना परवडणारे हे आकाश कंदील आहेत.
उपक्रमात रोशन पाटील, अंकिता पाटील, हर्षद गडकरी, स्नेहल भोईटे, सुधांशू खोत, रोहित आळतेकर, अक्षता बाऊचकर, अफ्रिन बनहटी, स्नेहा नंदुरकर, मिसबहा पटेल, प्राजक्ता पाटील व सई साळोखे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासह विश्वस्तांनी विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या. प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.