काही निवेदने आणि पत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला (Maharashtra CMO) आढळून आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी ४२०, ४६५,४६८,४७१ आणि ४७३ नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
अधिकार्यांच्या बदल्यांपासून व्यक्तिगत मदतीसाठीच्या निवेदनांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांची सुमारे बारा निवेदने समोर आली आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विविध कारणांसाठी निवेदने येत असतात. दौर्याच्या विविध ठिकाणांपासून ते ‘वर्षा’ निवासस्थानीदेखील अशी निवेदने पोहोचतात. त्यावर पुढील कार्यवाहीच्या शेर्यासह ही निवेदने पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविली जातात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन त्यांची ई-ऑफिस प्रणालीत नोंद केली जाते. त्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागांना ती पाठवली जातात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचार्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. या सर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री सचिवालयातील कार्यालयीन कर्मचार्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.