Logo
ताज्या बातम्या

दिवाळीत नफा कमवा! जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगची तारीख, वेळ

मुहूर्त ट्रेडिंग ही भारतातील एक विशेष आणि शुभ परंपरा मानली जाते. दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंगसाठी मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) एक तासांसाठी खुला राहतो. याला मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) असे म्हटले जाते.नवीन आर्थिक वर्षाची सकारात्मक सुरुवात म्हणून मुहूर्त ट्रेडिंगकडे पाहिले जाते आणि भारतीय शेअर बाजारातील ही एक महत्त्वाची परंपरा आहे. २०२३ मधील मुहूर्ताचे ट्रेडिंग रविवारी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बीएसईच्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७.१५ पर्यंत मुहूर्त ट्रेडिंगची वेळ निश्चित केली आहे. यात १५ मिनिटांच्या प्री-मार्केट सत्राचा समावेश आहे. मुहूर्ताचे ट्रेडिंग का मानले जाते महत्त्वाचे? दिवाळीचा पहिला दिवस हा हिंदू धर्मशास्त्रात लेखा वर्ष, सवंत म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की या दिवशीचा मुहूर्त वर्षभर संपत्ती आणि समृद्धी आणतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार एक तासासाठी खुला राहतो. कारण हे संवत २०७९ सुरु होण्याचे प्रतिक आहे. ज्याचा अर्थ हिंदू धर्मशास्त्रात लेखा वर्ष आहे. या दिवशी व्यापारी वर्ग वही पूजन करतात. दिवाळीत या मुहूर्तावर केले जाणारे पूजन शुभ मानले जाते. रविवारी शेअर बाजार नियमित वेळी बंद असतो. पण रविवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी केवळ एक तासासाठी खुला राहणार आहे. मुहूर्त ट्रेडिंगचा काय आहे इतिहास? ऐतिहासिक आकडेवारी असे सूचित करते की याआधीच्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना सकारात्मक अनुभव आले आहेत. गेल्या १० पैकी ७ विशेष सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स उच्च पातळीवर बंद झाला होता. गेल्या दोन मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर बाजाराने तेजीत व्यवहार केला होता. २०२२ मधील मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रत्येकी ०.८८ टक्के वाढले होते, तर २०२१ मध्ये दोन्ही निर्देशांक प्रत्येकी ०.४९ टक्क्यांनी वाढले होते. दिवाळीत बीएसईवर मुहूर्ताचे ट्रेडिंग १९५७ मध्ये सुरू झाले होते. तर एनएसईवर १९९२ मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इक्विटी फ्यूचर्स आणि ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) सारख्या विविध विभागांमध्ये एकाच वेळेच्या स्लॉटमध्ये ट्रेडिंग होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदानिमित्त बाजार बंद राहील. गुंतवणूकदारांना नफा कमवण्याची संधी? या दिवशी शेअर बाजारातील गुंतवणूकदार लाँगटर्म हिशोबाने चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करतात. तसेच काही शेअर्सच्या गुंतवणुकीमध्ये नफा असल्यास ट्रेडिंगच्या दरम्यान नफ्यातील काही भागाची विक्री करतात आणि लक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात नफा घरी आणतात.