भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रोड टोलिंग प्राधिकरणाने फास्टॅग युजर्ससाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. प्राधिकरणाने 32 बँकांची यादी तयार केली असून युजर्सना या बँकांकडूनच फास्टॅग खरेदी करण्यास सांगितले आहे.
पेटीएम पेमेंट्स बँक फास्टॅगचे नाव या यादीत नाही. त्यामुळे याचा सरळ अर्थ असा की पेटीएम फास्टॅग युजर्सचा नवीन फास्टॅग घ्यावा लागेल. एका अंदाजानुसार, देशात 2 कोटींहून अधिक पेटीएम फास्टॅग युजर्स आहेत. पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयने बंदी घातली आहे. सेंट्रल बँकेच्या सूचनेनुसार 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँकेने आपल्या जवळपास सर्व सेवा बंद केल्या आहेत.
सोशल मीडियाद्वारे निवेदन जारी
एक्स (X) या सोशल मीडिया हँडलवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये फास्टॅगने कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करा. तसेच, तुमचा फास्टॅग फक्त खाली दिलेल्या बँकांमधूनच खरेदी करा, असे म्हटले आहे. या यादीत जवळपास 32 बँकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, ज्यात पेटीएम नाही.
भारतात जवळपास सात कोटी फास्टॅग युजर्स
इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश पेटीएम फास्टॅग युजर्सना कोणत्याही त्रासापासून वाचवणे आहे, जेणेकरून त्यांना महामार्गावर प्रवास करताना टोल भरताना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. दरम्यान, भारतात जवळपास सात कोटी फास्टॅग युजर्स आहेत आणि पेटीएम पेमेंट बँकेचा दावा आहे की, त्यांच्याकडे 30 टक्क्यांहून मार्केट शेअर आहेत. अशा स्थितीत पेटीएम पेमेंट बँकेच्या युजर्सची संख्या अंदाजे जवळपास 2 कोटी आहे.