मातृदिनापूर्वी देशासाठी खूशखबर समोर आली आहे. भारतात मातांच्या मृत्यूदरात मोठी घट झाल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. 2000 साली दर एक लाख मुलांच्या जन्मामागे 384 मातांचा मृत्यू व्हायचा. 2020 मध्ये हे प्रमाण कमी होत 103 वर आला आहे. म्हणजेच 20 वर्षांमध्ये मातृ मृत्यूदरात मोठी घट नोंदविली गेली आहे. जगभरात मातांच्या मृत्यूदरात घट झाली आहे. परंतु याप्रकरणी भारतात सर्वाधिक सुधारणा दिसून आली आहे. 2000 साली पूर्ण जगात दर एक लाख मुलांच्या जन्मामागे 339 मातांचा मृत्यू व्हायचा, हे प्रमाण 2020 मध्ये कमी होत 223 वर आले आहे. 2000-2020 दरम्यान मातांचा मृत्यूदर जागतिक स्तरावर 2.07 टक्के होता. तर भारतात मातृ मृत्युदरात सुमारे 6.36 टक्क्यांची घट झाली आहे. जागतिक दराच्या तुलनेत भारतात मोठ्या प्रमाणात मातृ मृत्यूदर कमी झाला आहे. भारतात याप्रकरणी मोठी सुधारणा दिसून येत असली तरीही अद्याप मोठा पल्ला गाठायचा असल्याचे सरकारच्या अहवालात म्हटले गेले आहे. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली आहे. जोस के मणि यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता