बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याप्रश्री लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वस्तू नको पैसे द्या, जेवण नको पैसे द्या आदि घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून गेला.मोर्चाची सुरुवात लक्ष्मी मार्केट इथून झाली. मोर्चा मुख्य मार्गाने घोषणा देत सहाय्यक कामगार कार्यालयावर येवून धडकला.महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 20000 कोटी रुपये पेक्षा जास्त पैसे जमा आहेत. मात्र त्या तुलनेत बांधकाम कामगारांना लाभ मिळत नाही. लाभासाठी दाखल केलेले अनेक अर्ज कोणत्याही त्रुटी नसताना कामगार कल्याण अर्ज नामंजूर केले जात आहेत. नवीन अर्ज दाखल करताना अनेक अडचणी येत आहेत. परिणामी अनेकांना तीन-चार महिन्याचा तारखा मिळत आहे त्याचा परिणाम लाभार्थ्यावर होत असून, हातकणंगले शिरोळ तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार लाभा पासून वंचित आहेत.मंडळातर्फे बांधकाम कामगारांची भांडी देण्याची घोषणा केली. त्याचा ठेका मुंबईतील एका ठिकेदारास देण्यात आला आहे. तो ठेकेदार चार हजार रुपयाची भांडी देत आहे, त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा, आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. कामगार मंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या परंतु प्रत्यक्षात अमलात आल्या नाहीत. त्यासाठी वस्तू नको जेवण नको पैसे द्या अशा मागण्या यावेळी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.