Logo
ताज्या बातम्या

भारतासाठी 2024 ठरणार सुवर्ण वर्ष; सोन्याची मागणी जाणार 900 टनांच्या घरात

गेली पाच वर्षे 800 टनांच्या आसपास असलेली सोन्याची मागणी पुढील आर्थिक वर्षांत (2024-25) 900 टनांच्या घरात जाईल. मात्र, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मागणी कमी असेल, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्लूजीसी) बुधवारी वर्तवला. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे 2023मध्ये मागणी तीन टक्क्यांनी घटून 747.5 टनांवर आली होती. मागणीतील ही घट 2020 नंतरची सर्वाधिक होती. सोन्याच्या दागिन्यांची मागणी घटल्याने एकूण मागणीत घट झाली. अर्थगती वाढल्याने महागाईचा तितकासा परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात सोन्याची मागणी 900 टनांच्या घरात जाईल, असे डब्लूजीसीच्या इंडियन ऑपरेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पी.आर. यांनी दिली. भारतात स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती, पेरू आणि घाना या देशांतून प्रामुख्याने सोन्याची आयात होते. बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मार्च 2024 अखेर संपणार्‍या तिमाहीत सोन्याच्या दागिन्यांची मागणी घटेल. कमी लग्न मुहूर्त असल्याने मागणीत घट होईल. भारतात लग्नसराईच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. वधू-वर आणि आप्तांसाठी सुवर्ण अलंकार खरेदी करण्याची प्रथा आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर -2023 या तिमाहीत सोन्याची मागणी चार टक्क्यांनी घटून 266.2 टनांवर आली. सुवर्णनाणी आणि सोन्याच्या विटांमध्ये अधिक गुंतवणूक केली जात आहे. तर, दागिन्यांची खरेदी घटल्याने एकूण विक्रीत घट झाल्याचे डब्लूजीसीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने सोने तस्करी वाढून सुमारे 130 टनांवर गेली असल्याचे सोमसुंदरम म्हणाले.