वस्त्रनगरीत पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून तो आता पेटला आहे. शहरातील नागरिकांना आठ दिवसांतून एकदा पाणी आणि तेही अपुरे मिळत आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर दुसरीकडे या प्रश्नाबाबत खासदार, आमदार काहीच लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आता पाणी प्रश्नावरुन मोठे जनआंदोलन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पंचगंगा नदी दूषित तर कृष्णा पाणी पुरवठा योजनेला वारंवार लागणारी गळती याचाच परिणाम शहरात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.