स्वामी विवेकानंद हे दूरद़ृष्टीचे भारतीय तत्त्वज्ञ होते. त्यांनी भारतीय संस्कृतीचा जगभर प्रसार केला. तसेच भारतीय समाजापुढे अनेक जिवंत प्रश्नांची त्यांनी यथार्थ चर्चा केली होती. शिक्षण हे त्यांच्या प्रतिभाशाली चिंतनाचे एक मौलिक क्षेत्र होते. माणसातील माणूसपण जागविणारे शिक्षण हवे, असे त्यांचे मत होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीप्रीत्यर्थ त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणारा हा लेखप्रपंच.
शिक्षण म्हणजे माणसाच्या आत्म्यातील प्रकाश त्याला पुन्हा प्राप्त करून देण्याची प्रक्रिया होय, असे स्वामी विवेकानंद यांचे मत होते. आत्म्यावर निर्माण झालेली काळजी दूर करणे शिक्षणाच्या माध्यमातून शक्य होते व माणसाला त्याचा स्वतःचा लख्ख प्रकाश मिळतो, असे त्यांचे स्वत:चे मत होते. 21 व्या शतकात नवभारताची उभारणी करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार प्रेरक ठरणारे आहेत. त्यामुळे या लेखात त्यांच्या शैक्षणिक विचारांचे परिशीलन केले आहे.
शिक्षणाचा खरा अर्थ
शिक्षण म्हणजे काय? केवळ पुस्तके नव्हेत, विविध ज्ञानाचा संग्रह नव्हे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्या प्रशिक्षणामुळे वर्तमान आणि आविष्काराची अभिव्यक्ती नियंत्रणात आणली जाते आणि फलदायी बनते, त्याला शिक्षण म्हणतात. याचा अर्थ असा की, स्वामी विवेकानंदांना शिक्षणातून कल्पकता व सर्जनशीलता अभिप्रेत होती. शिक्षणाने माणसाला यंत्रवत बनवू नये, गुलाम बनवू नये त्याला मुक्तपणे विचार करण्याची संधी शिक्षणाने दिली पाहिजे.
शिक्षण हे शाश्वत व विकासाचे साधन व्हावे, शिक्षणाच्या माध्यमातून भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहावे अशी त्यांची अपेक्षा होती. तेजस्वी ध्येयवादी आणि पोलादी मनगटाचा जागृत युवक अशा बलशाली राष्ट्राचा आधार होय, असे त्यांचे मत होते. अशा ध्येयप्राप्तीसाठी तरुणांनी निर्धाराने व निश्चयाने अखंंडपणे चालत राहावे. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत मार्गक्रमण करत राहावे, अशी त्यांची भूमिका होती. तरुणांसमोर ध्येयवादी व चारित्र्यसंपन्न जीवनाचा आदर्श ठेवला होता. कला व क्रीडा संस्कारातून तरुणांचे जीवन घडते. त्यासाठी तरुणांच्या मनावर सुसंस्कार करण्याची गरज आहे, असे ते म्हणतात.
शिक्षण म्हणजे एक तेजस्वी व तेज:पुंज हिरा आहे. तर नीती म्हणजे त्यांच्या भोवती असलेले कोंदण होय, असे रवींद्रनाथ टागोर म्हणतात. गुरुदेवांचे हे विचार विवेकानंदांच्या विचारांशी जवळीक साधणारे आहेत. स्वामी विवेकानंद म्हणत, लोकांना शिक्षित करा, त्यांचे जीवन संस्कार प्रक्रियेतून वाढवा, त्यातून एक नवे राष्ट्र उभे राहू शकेल. अशा प्रकारे शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शाश्वत विकासाचा मंत्र दिला.
त्यांच्या मते, विद्यापीठे म्हणजे केवळ हस्तिदंती मनोरे नव्हेत. तसेच शिक्षण म्हणजे विद्यापीठाच्या ग्रंथालयातील हजारो पुस्तकांचे गठ्ठे नव्हेत. शिक्षण म्हणजे त्यातील ज्ञानी प्राध्यापकांचे कार्य होय. आपल्या शैक्षणिक संस्था व विद्यापीठे ज्ञान निर्मिर्तीची केंद्रे व्हावीत, असा त्यांचा आग्रह होता. चांगले आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांवर नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचा संस्कार करू शकतात, असे त्यांचे मत होते.
भारतामध्ये वर्तमानकाळात सर्वांत मोठे आव्हान कोणते असेल तर चारित्र्यनिर्मितीचे आहे. ज्याचे चरित्र तेजस्वी अग्नीसारखे आहे, असा तरुण वर्ग शिक्षणातून उभा राहावा आणि त्याच्यासमोर उच्च शिक्षणातील ध्येयवादाचे एक जिवंत उदाहरण असावे, अशी त्यांची अपेक्षा होती. एखाद्याने त्याच्या बालपणापासून सत्शील व सद्गुणी आयुष्य जगले पाहिजे. ज्ञान म्हणजे सद्गुण. जर ज्ञान मिळविता येते तर सद्गुणांचीही जोपासना करता आला पाहिजे, अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या देशात ज्ञानाचा प्रसार साधू-संतांनी केला आहे. तरुणांनी त्यांचे जीवनकार्य अभ्यासले असता त्यांनाही मूल्य शिक्षणाचे महत्त्व कळू शकेल.
सर्वाधिक तरुणांचा देश असणार्या नवभारताच्या उभारणीसाठी विवेकानंदांचे शैक्षणिक विचार भारताला समर्थ व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी पथदर्शक ठरणारे होत. आपल्याला अध्ययन, अध्यापन, संशोधन व विस्तार या चारही क्षेत्रांत नवी उंची गाठण्यासाठी त्यांचे शैक्षणिक विचार अनुसरले पाहिजेत.