Logo
ताज्या बातम्या

जगातील आनंदी देशांची 'क्रमवारी' जाहीर, भारत कितव्‍या स्‍थानी? जाणून घ्‍या सविस्‍तर

आनंदी राहणे ही कला आहे, असे मानलं जाते. त्‍यामुळेच जे मिळाले त्‍यामध्‍ये समाधानी राहा, असा सकारात्‍मक विचार ज्‍येष्‍ठांकडून तरुणाईला दिला जातो. तुकाराम महाराजांचा ‘ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान’ या अभंगाचे स्‍मरण आपल्‍याला समाधानी राहण्‍यास शिकवते. हा झाला सकारातम्‍क विचार. मात्र भारतीय तसे फारसे ‘आनंदी’ नाहीत, असे संयुक्‍त राष्‍ट्रे ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ने प्रकाशित केलेल्‍या अहवालातील आकडेवारीतून स्‍पष्‍ट होते. जाणून घेवूया आनंदी देशासाठीचे निकष कोणते आणि भारत यामध्‍ये कोणत्‍या स्‍थानी आहे याविषयी…. फिनलंड पुन्‍हा अग्रस्‍थानी, अफगाणिस्‍तान तळाला जगभरातील आनंदी देशांची क्रमवारी ( ग्लोबल हॅपीनेस रिपोर्ट) जाहीर करण्यात आली आहे. संयुक्‍त राष्‍ट्रे ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ अंतर्गत प्रकाशित हा अहवाल १४६ देशांमधील जागतिक सर्वेक्षण डेटावर आधारित आहे. या यादीत पुन्‍हा एकदला फिनलंड हा देश अग्रस्‍थानी आहे. सलग सातव्‍यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरण्‍याचा बहुमान या देशाला मिळाला आहे. हॅपीनेस इंडेक्समध्ये फिनलंडने ७.८४२ गुण मिळवले आहेत. तर २०२१ मध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्‍तानमधील नागरिकांचे जगणं अधिक कष्‍टप्रद झाले असून, हा देश आनंदी देशांच्‍या यादीत तळाशी आहे. आनंदी देशासाठीचे निकष काय? एखादा देश आनंदी आहे याचे निकष ठरविताना त्‍या देशाचे सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍न, जीवन जगण्‍याचा दर्जा, कल्याणकारी समाज, नागरिकांचा सरकारी संस्थांवरील विश्वास, भ्रष्टाचाराची पातळी, सार्वजनिक आरोग्यसेवा आणि शिक्षण आदी मुद्यांसह जीवनातील समाधानाचे वैयक्तिक मूल्यमापन करून आनंदी देशाची क्रमवारी निश्चित केली जाते. जगातील १० टॉप आनंदी देश ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ अंतर्गत प्रकाशित अहवालानुसार, आनंदी देशाच्‍या यादीत फिनलंड पहिल्‍या तर डेन्‍मार्क दुसर्‍या स्‍थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेला आइसलँड हा देश आहे. इस्रायल चौथ्या आणि नेदरलँड पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्‍हणजे इस्रायल गेल्या वेळी नवव्या क्रमांकावर होता. आनंदी देशांच्या यादीत स्वीडन सहाव्या क्रमांकावर आहे. नॉर्वे सातव्या, स्वित्झर्लंड आठव्या, लक्झेंबर्ग नवव्या आणि न्यूझीलंड दहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिका टॉप 20 मधून बाहेर! अमेरिका आणि जर्मनी अनुक्रमे २३ आणि २४ व्‍या स्‍थानावर असून टॉप २० मधून बाहेर पडले आहेत. तर कोस्टा रिका आणि कुवेत यांनी अनुक्रमे १२ व १३ वे स्‍थान मिळवत टॉप 20 मध्ये स्थान मिळवले आहे. आनंदाच्या पातळीत अफगाणिस्तान, लेबनॉन आणि जॉर्डन या देशात मोठी घट झाली आहे, तर सर्बिया, बल्गेरिया आणि लॅटव्हिया सारख्या पूर्व युरोपीय देशांमध्ये आनंदात लक्षणीय वाढ झाल्‍याचेही या अहवालात नमूद केले आहे.उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील तरुणांमधील आनंद कमी झाला आहे. तर मध्य आणि पूर्व युरोपमध्ये त्याच कालावधीत सर्व वयोगटांमध्ये आनंदात वाढ झाली आहे. भारत कितव्‍या स्‍थानी? आनंदी देशांच्‍या यादीत भारत १२६ व्‍या स्‍थानावर आहे. अहवालात असे आढळून आले आहे की, भारतात वृद्धापकाळ हा उच्च जीवनातील समाधानाशी संबंधित आहे. जागतिक स्तरावर, स्त्रिया प्रत्येक प्रदेशात पुरुषांपेक्षा कमी आनंदी होत्या, त्यांच्या वयानुसार लिंग अंतर वाढत गेले, असे अहवालात म्हटले आहे. या अहवालात म्‍हटले आहे की, भारत हा वृद्ध लोकसंख्या असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ( सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या चीनमध्‍ये आहे ) भारतात ६० आणि त्याहून अधिक वयोगटातील 140 दशलक्ष नागरिक आहेत. तसेच 60 आणि त्याहून अधिक वयाच्या भारतीयांसाठी सरासरी वाढीचा दर देशाच्या एकूण लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा तीन पट जास्त आहे. वृद्धत्व भारतातील उच्च जीवन समाधानाशी संबंधित आहे.सरासरी, भारतातील वृद्ध पुरुष वृद्ध स्त्रियांच्या तुलनेत अधिक समाधानी असतात. वृद्ध स्त्रिया त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा जास्त जीवन समाधानी आहेत. माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेले वयस्कर प्रौढ आणि उच्च सामाजिक जातीचे लोक औपचारिक शिक्षण नसलेल्या आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील समवस्‍यकांपेक्षा आनंदी असल्‍याचे नोंदवतात. चीन ६० व्‍या क्रमांकावर तर पाकिस्‍तान १०८ स्‍थानावर आनंदी देशाच्‍या यादीत चीन 60, नेपाळ 93, पाकिस्तान 10, म्यानमार 118, श्रीलंका 128 आणि बांगलादेश 129व्या स्थानावर आहे.