अल्पवयीन तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत बलात्कार आणि कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन 16 तोळ्यांचे दागिने लुबाडणार्या आदिनाथ विजय उगळे (वय 25, रा. अमृतनगर, गिरगाव रोड, पाचगाव, ता. करवीर) याच्याकडून करवीर पोलिसांनी 7 तोळे दागिने व 1 लाख 7 हजारांची रोकड मंगळवारी हस्तगत केली.
अल्पवयीन तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गिरगाव येथील लॉजवर नेऊन दोनवेळा बलात्कार केला. दरम्यान, आपण कर्जबाजारी असल्याचा बहाणा करून संशयिताने तरुणीकडून 16 तोळ्यांचे दागिने लुबाडले होते.
कालांतराने पीडित तरुणीने संशयिताकडे दागिन्यांची मागणी केली असता, त्याने तरुणीला सोशल मीडियाद्वारे बदनामीची धमकी दिली होती. दागिने घेतल्याची वाच्यता केल्यास तिच्यासह कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकीही दिली होती. या घटनेने भेदरलेल्या तरुणीने कुटुंबीयांसह करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन कैफियत मांडली होती.
करवीर पोलिसांनी मुख्य संशयित आदिनाथ उगळेसह तन्मय राजाराम सुतार (रा. नंदगाव), सराफी कारागीर रोहित मधुकर काळे (रा. गाडगीळ कॉलनी, शांतिनगर, पाचगाव) यांना अटक केली. चौकशीत पोलिसांनी उगळे याच्याकडून 7 तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत. उर्वरित 9 तोळे दागिन्यांची संशयिताने कुठे विल्हेवाट लावली, याचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.