अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा हा शास्त्रांच्या नियमानुसारच होत आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी गर्भगृह पुरेसे असते. मुहूर्त महत्त्वाचा असतो. याउपर मंदिराचे कामही जवळपास झालेलेच आहे. मुख्य यजमान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडही शास्त्रसंमत आहे, असे जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी गुरुवारी येथे सांगितले.
प्रत्यक्ष विधीत पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधी म्हणून गृहस्थ असलेले अनिल मिश्रा हे सपत्निक बसलेले आहेत. शास्त्रांना कुठलाही धक्का लागलेला नाही. बहुप्रतीक्षित सोहळ्यात काहीतरी खुसपट काढण्याच्या कुपमंडूक प्रवृत्तीचा मी निषेध करतो, असेही रामभद्राचार्य यांनी स्पष्ट केले. कळस पूर्ण झाला नाही म्हणून प्राणप्रतिष्ठा करता येत नाही, अशी भूमिका मांडणार्यांना शास्त्रांचे ज्ञान नाही. मंदिराच्या दुसर्या मजल्यावर जेव्हा राम-सीता स्थानापन्न होतील, तेव्हा कळसाचे काम होईल. प्राणप्रतिष्ठेचे कळसाशी काही देणेघेणे नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी सात्विक जीवन जगतात. ते 11 दिवसांच्या उपवासावर आहेत. आणखी काय हवे, असेही त्यांनी सांगितले. मी स्वत: रामानंदाचार्य आहे. मी प्राणप्रतिष्ठेला येतोय. शंकराचार्यांच्या बरोबरीचे माझे धर्मपद आहे. मंदिरासाठीच्या संघर्षात कुणी शंकराचार्य सहभागी झाले होते काय, असा खडा सवालही त्यांनी केला.