अग्निवीर वायू दलातील ४८ महिला प्रजासत्ताक दिन परेड २०२४ मध्ये सहभागी होत आहेत, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
महिला लढाऊ वैमानिक प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टचा भाग असतील, असे देखील भारतीय हवाई दलाचे पीआरओ विंग कमांडर आशिष मोघे यांनी म्हटले आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये २९ लढाऊ विमाने, ८ वाहतूक आणि १३ हेलिकॉप्टर आणि एका हेरिटेज विमानासह एकूण ५१ विमाने सहभागी होतील. C-295 वाहतूक विमान प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे.
आयएएफने दिलेल्या माहितीत १९७१ च्या पाकिस्तानवर विजय मिळविलेल्या प्रसिद्ध टांगेल एअरड्रॉपचे चित्रण देखील केले जाईल. तसेच एक डकोटा विमान आणि दोन डॉर्नियर टांगेल निर्मितीमध्ये उड्डाण करतील, असे देखील इंडियन एअर फोर्सने आज दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.