Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :प्रियकराने गळा दाबून ‘त्या’ तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

शहापूर येथे प्रियकराने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केलेल्या प्रेयसीचा उपचारांदरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. तिच्यावर तीन दिवसांपासून सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरेखा राजू सोलनकर (वय 30, रा. चिपरी, ता. शिरोळ) असे मृत महिलेचे नाव आहे. सतत होत असलेल्या भांडणाच्या रागातून प्रियकराने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करून खोलीला बाहेरून कुलूप घालून पळून गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सचिन गौतम माने (रा. इंदिरानगर सांगली) याच्या विरोधात प्रेयसीचा भाऊ कृष्णा भूपाल दुधाळ (वय 33, रा. संजयनगर, सांगली मूळ रा. अंकले ता. जत) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या मृत्यूनंतर गुन्ह्यातील खुनाचे कलम पोलिसांनी वाढविले आहे. सुरेखा व सचिन यांच्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. शहापूर येथील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या ओमकार लोहार यांच्या मालकीच्या खोलीमध्ये ते राहत होते. त्यांच्यात नेहमी भांडणे होऊन सचिन हा सुरेखाला मारहाण करीत होता. सततच्या भांडणाच्या कारणावरून सचिनने शनिवारी रात्री 9 च्या सुमारास सुरेखाचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करून घराला बाहेरून कुलूप लावून पळून गेला. काही वेळानंतर घर मालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने दरवाजा तोडून सुरेखाला उपचारांसाठी सांगली सिव्हिल इस्पितळात दाखल केले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. संशयित सचिन माने हा अद्यापही पसार आहे. अधिक तपास उपनिरीक्षक दीपक माळी करीत आहेत.