काही दिवसांपूर्वी देशभरात टॉमेटोनं सर्वसामान्यांच्या खिशाला चिमटा काढलेला. आता आधाचीपासूनच महागाईमुळे पिचलेल्या सर्वसामान्यांना कांदा रडवण्याच्या तयारीत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, दिल्ली एनसीआरसह अनेक शहरांमध्ये कांदा 80 रुपये किलोच्या आसपास विकला जात आहे. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात दुपटीनं वाढ झाली आहे. जिथे काही दिवसांपूर्वी कांदा 30 ते 35 रुपये किलोनं विकला जात होता. तिथे आता 75 ते 80 रुपये किलोनं विकला जात आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एकंदरीत यंदा कमी पडलेल्या पावसामुळे कांद्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वधारल्यामुळे सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेत, एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात वाढलेली कांद्याची मागणी कमी करण्यासाठी केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणणार आहे. तसेच, अनेक राज्यांमध्ये हा स्कॉट जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
सरकार 16 शहरांमध्ये बफर स्टॉक विकणार
दिवाळीपूर्वीच कांद्याबरोबरच इतर भाज्यांनाही मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांत कांद्याचे दर दुपटीनं वाढले आहेत, तर इतर भाज्यांचे भाव पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यानं सांगितलं की, सध्याच्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधून सुमारे 16 शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू ठेवेल.
कुठे आणि किती किंमत?
देशाच्या भांडवली किरकोळ बाजारात कांद्याचा सरासरी दर 80 रुपये किलोनं विकला जात आहे, जो गेल्या आठवड्यात 60 रुपये आणि दोन आठवड्यांपूर्वी 30 रुपये होता. चंदीगढ, कानपूर आणि कोलकाता सारख्या इतर शहरांमध्ये कांद्याचे भाव सारखेच आहेत. ते आणखी पुढे जाऊ शकतात, असं किरकोळ बाजारातील विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
निर्यात शुल्क लागू
कांद्याची किंमत कमी करण्यासाठी सरकारनं 28 ऑक्टोबर रोजी किमान निर्यात शुल्क (MEP) 800 डॉलर निश्चित केलं आहे. या लादलेल्या शुल्कामुळे सर्वोच्च किंमतीतून 5 ते 9 टक्क्यांनी घट झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात कांद्याच्या घाऊक भावात 4.5 टक्क्यांनी घट झाली आहे.
पावसाळ्यामुळे पुरवठ्यावर परिणाम
जून ते सप्टेंबर या कालावधीतील कमकुवत पावसानं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रमुख पुरवठादारांमध्ये खरीप कांदा पिकाचं नुकसान केलं आहे. त्यामुळे कांद्याच्या काढणीला उशीर झाला, तर हिवाळी पिकांचा साठा जवळपास संपला असून त्यामुळेच दर पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे.