ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वायकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी ८.३० च्या सुमारास ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. दहा ते बारा ईडीच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे, आर्थिक गैरव्यवहारा संदर्भात ही धाड असल्याचे बोलले जात आहे. रविंद्र वायकर त्यांच्या निवासस्थानीच आहेत, कोविड घोटाळ्या प्रकरणी गेल्या काही दिवसापासून काही अधिकारी आणि नेते रडारवर होते.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आर्थिक प्रकरणांचा गेल्या काही दिवसापूर्वी पाठपुरावा दिला होता. दरम्यान आता आज वायकर यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली आहे. सध्या त्यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू आहे.
ईडी चौकशी आधी ईडीने नोटसही दिली होती, तर दुसरीकडे उद्या म्हणजेच बुधवारी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल वाचून दाखवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ईडीने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
ईडी चौकशी प्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी कोर्टातही धाव घेतली होती. ईडीने त्यांना समन्सही पाठवण्यात आले होते. आता ईडीने सकाळीच धाड टाकली असून गेल्या दोन तासांपासून ईडी तपास करत आहे.
नेमकं प्रकरण काय?
आमदार रविंद्र वायकर यांच्या संबंधीत जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी प्रलंबित आहे, मुंबई पोलिसांनी या प्रकरमी गुन्हाही दाखल केला आहे. या आधारावरच ईडीने वायकर यांच्यावर मनी डॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल केला होता. महापालिकेचे मैदान आहे त्यावर हॉटेल बनवण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये बनावट कागदपत्रे बनवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. दुसर एक प्रकरण म्हणजे अलिबाग मधील १९ बंगल्यांच्या आरोपातही वायकर यांचे नाव घेण्यात आले होते. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे.