अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास करणार आहेत. शरयू नदीत ते स्नानही करतील. प्राणप्रतिष्ठा समारंभाचे ते मुख्य यजमान आहेत, हे त्यामागचे कारण…
राम मंदिराच्या भूमिपूजनदिनीही पंतप्रधान मोदींनी उपवास केला होता. पंतप्रधानांचा संकल्पित अक्षत अयोध्येला पोहोचल्यानंतर १६ जानेवारीपासून अभिषेक सोहळा सुरू होईल. अभिषेकाच्या यजमानांनी पवित्र नदीत स्नान करणे आवश्यक असते, अशी माहिती अयोध्येतील महंत मिथिलेश नंदानी शरण यांनीही दिली. काशी विश्ननाथ मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगीही पंतप्रधान मोदी यांनी गंगेत स्नान केले होते.
४२ दारांवर १०० किलो सोने
मंदिराचे ४६ पैकी ४२ दरवाजे १०० किलो सोन्याने मढवले जातील. पायऱ्यांजवळील ४ दरवाजांवर मात्र सोन्याचा मुलामा चढवला जाणार नाही.
वृक्षारोपण होणार
७० एकरांतील ३० टक्के जागेवर बांधकाम असेल. उर्वरित जागेत झाडे लावली जातील. पूर्वीपासूनची ६०० पेक्षा जास्त झाडेही या जागेवर आहेत.
छत्तीसगडमध्ये ‘ड्राय डे’
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २२ जानेवारी रोजी ड्राय डे घोषित केला आहे. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत छत्तीसगडमध्ये सुशासन दिन पाळण्यात आला. प्रभू रामचंद्राचे आजोळ हे छत्तीसगड आहे.