येत्या १२ ते १६ जानेवारीदरम्यान शहरात होत असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला असून, त्यामध्ये विभागांना महोत्सव यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदानावर होणार आहे आणि महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी या ठिकाणी होणार आहे.
महोत्सवात २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी १०० युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे आठ हजार जण यात सहभागी होणार आहेत. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समूह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.
महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती आहेत. त्याचबरोबर गृह, वित्त, महसूल, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, पर्यटन, शालेय शिक्षण या विविध विभागांचा सहभाग आहे.