राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाचा निकाल आता थेट पुढच्या वर्षात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा कोणाचा यावर सुरू असलेला शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ८ डिसेंबरला पूर्ण झाला. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. ८ डिसेंबर नंतर दोन तीन आठवड्यात राष्ट्रवादी कोणाची यावर निकाल येईल असे बोलले जात होते. मात्र आता ही शक्यता मावळली आहे. हा निकाल थेट पुढच्या वर्षात येण्याची शक्यता आहे.
दिर्घकाळ चाललेल्या युक्तीवादात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजु मांडली. तर अजित पवार गटाकडून वकील मुकुल रोहोतगी आणि नीरज किशन कौल यांनी बाजु मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात आमदारांचा एक गट सत्तेत सहभागी झाला. शरद पवार गट मात्र महाविकास आघाडी सोबत राहिला. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले. निवडणूक आयोगात यावर सुनावण्या झाल्या. दोन्ही गटांच्या वतीने आपण कसे मजबूत आहोत किंवा पक्ष आपलाच आहे, यासाठी विविध पुरावे सादर करण्यात आले, युक्तिवाद करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात निवडणूक आयोगाचा यावरील निर्णय येण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची यावरील निवडणूक आयोगाचा निर्णय आता थेट पुढच्या वर्षात येणार असल्याचे बोलले जात आहे.