Logo
ताज्या बातम्या

राज्य शासनातर्फे लसीकरणापासून वंचित मुलांसाठी ’कॅच अप’

लसीकरणाच्या ’मिशन इंद्रधनुष्य’अंतर्गत एमएमआर-1 आणि एमएमआर-2 पासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी राज्य शासनातर्फे ‘कॅच अप’ मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत डिसेंबरमध्ये एमएमआर-1 लसीकरणाचे 40 टक्के आणि एमएमआर-2 लसीचे 58 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. जानेवारी महिन्यात ‘कॅच अप’ मोहिमेचा पुढील टप्पा राबवला जाणार आहे. हिवाळ्यातील वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांमध्ये गोवर आजाराचा उद्रेक होण्याची शक्यता असते. त्यामुळे वंचित बालकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत ‘मिशन इंद्रधनुष्य’ ही मोहीम राबवण्यात आली. मुख्यत: स्थलांतरित मजूर, कामगारांच्या मुलांचे लसीकरण मागे पडल्याचे लक्षात आले. तसेच, काही ठिकाणी लसीकरणाला असलेला विरोध, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचा-यांचे आंदोलन यामुळेही लसीकरण टक्का घटला. त्यामुळे विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती साहाय्यक आरोग्य संचालक डॉ. प्रवीण वेदपाठक यांनी दिली. वेदपाठक म्हणाले, ‘कोरोना काळात लसीकरणावर परिणाम झाला होता. काही मुलांचा पहिला डोस झाला होता. मात्र, दुसरा डोस शिल्लक होता. काही मुलांचे एमएमआर लस घेण्याचे वय उलटून गेले. अशा सर्व मुलांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, वर्धा, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.’