Logo
ताज्या बातम्या

सोन्यात आजपासून गुंतवणूक करण्याची नामी संधी! 10 ग्रॅम सोन्यावर सरकारची बंपर सूट

पुन्हा एकदा सरकारी योजनेंतर्गतसोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आली आहे. सॉवरेन गोल्ड बॉण्डची नवी सीरिज आजपासून म्हणजेच, सोमवार, 18 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. ज्यामध्ये तुम्ही 22 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, यावेळी तुम्हाला एक ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 6,199 रुपये खर्च करावे लागतील. ही किंमत बाजारातील सोन्याच्या किमतींपेक्षा कमी आहे, जी IBJA च्या प्रकाशित दराच्या आधारे ठरवली जाते. तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉण्डसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता. सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेअंतर्गत 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर 2.50 टक्के वार्षिक निश्चित व्याज दिलं जातं. जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही यावर कर्ज देखील घेऊ शकता. ही योजना आरबीआयद्वारे चालवली जाते. 10 ग्रॅम सोन्यावर बंपर सूट जर एखाद्या व्यक्तीनं ऑनलाईन गुंतवणूक केली आणि सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेत डिजिटल पेमेंट केलं, तर त्याला 50 रुपयांची सूट दिली जाते. म्हणजेच, 1 ग्रॅम सोन्यासाठी 6,149 रुपये मोजावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्हाला 10 ग्रॅम सोन्यासाठी 500 रुपयांच्या सूटसह 61,490 रुपये मोजावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकता. त्याचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्ष आहे. 8 वर्षापूर्वी बॉण्ड विकल्यास टॅक्स भरावा लागेल सॉवरेन गोल्ड बॉण्डचा मॅच्युरिटी पिरियड 8 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत, मॅच्युरिटी पिरियड पूर्ण झाल्यानंतर नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही, पण जर तुम्ही तुमचे पैसे 5 वर्षांनंतर काढले, तर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG रूपात नफ्यावर 20.80 टक्के टॅक्स भरावा लागेल. सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या पहिल्या सीरिजवर किती रिटर्न मिळणार? सॉवरेन गोल्ड बॉण्डची पहिली सीरिज 30 नोव्हेंबर रोजी मॅच्युअर्ड झाली. हा बॉण्ड 26 नोव्हेंबर 2015 रोजी 2,684 रुपये प्रति ग्रॅम या इश्यू किंमतीवर आला. तसेच, लोकांनी मॅच्युरिटीवर ते 6,132 रुपये प्रति ग्रॅम दरानं विकलं. त्यानुसार गेल्या 8 वर्षांत गुंतवणूकदारांना एकूण 128.5 टक्के रिटर्न मिळाला आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीनं नोव्हेंबर 2015 मध्ये गोल्ड बॉण्डमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला आता 2.28 लाख रुपये मिळाले असते.