मागील आठवड्यात संसदेत झालेली घुसखोरीची घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामागे कोणते घटक आहे, घुसखोरांचे उद्दिष्ट काय आहे, हे शोधणे महत्त्वाचे आहे. सखोल तपास सुरू असून त्यावर चर्चा, वादविवाद करण्याची गरज नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
घुसखोरीच्या घटनेचे गांभीर्य कमी केले जाऊ नये. लोकसभा अध्यक्ष सर्व आवश्यक पावले उचलत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी ‘दैनिक जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. लोकसभेत मागील बुधवारी प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारत घोषणबाजी केली, तसेच स्मोक क्रॅकर फोडत रंगीत धूरही केला. त्यांच्या घुसखोरीचा उद्देश मणिपूर हिंसाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधणे हा होता, असे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.