शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. अपात्रतेच्या याचिका निकाली काढण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आक्षेप दोन्ही याचिकांद्वारे घेण्यात आला आहे.
ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकांची दखल घेत मागील दोन सुनावण्यांवेळी सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकर यांची कानउघाडणी केली होती. आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना दिले होते. सुधारित वेळापत्रक देण्यासाठी ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल, असे त्यावेळी खंडपीठाकडून सांगण्यात आले होते.
अध्यक्षांनी वेळापत्रक दिले नाही तर, आम्हीच वेळापत्रक देऊ आणि त्या वेळापत्रकाचे पालन करावे लागेल, असे सरन्यायाधीशांनी सुनावले होते. त्यामुळे नार्वेकर सुधारित वेळापत्रक देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यावर अध्यक्ष नार्वेकर कामाला लागले होते. आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांना ७ याचिकांमध्ये एकत्र करून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. याबाबतचा तपशील सोमवारच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला दिला जाण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाने शिंदे गटाच्या आमदारांविरोधात तर, शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेचा दावा दाखल केला आहे. मात्र यावर निर्णय घेण्यास अध्यक्ष टाळाटाळ करीत असल्याचे दोन्ही गटांचे म्हणणे आहे. यासंदर्भात ठाकरे व शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. दोन्ही याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी घेण्याचे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते.
तुषार मेहतांशी चर्चा
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे पाऊण तास ही चर्चा चालल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘‘मेहता यांच्याकडून जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो घेतला आहे. न्यायालयात आम्ही योग्य ती भूमिका मांडू,’’ असे नार्वेकर यांनी नंतर नमूद केले.