राजीनामा देण्यापेक्षा नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी आज केले. आज (दि.२९) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पाटील यांची प्रकृती खालावली असल्याने मराठा समाजासह राजकीय क्षेत्रातून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यावेळी आंदोलक सहकाऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी पाण्याचा एक घोट देखील घेतला.
आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही
खासदार हेमंत पाटील यांच्या राजीनाम्यावर बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, नेत्यांनी राजीनामा देण्यापेक्षा नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी एकत्र यावं. जीवाची बाजी लावल्याशिवाय आंदोलन मिळणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मराठा आंदोलकांनी उग्र आंदोलन करु नये
मराठा आंदोलकांनी उग्र आंदोलन करु नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. मला बोलता येतंय तोपर्यंत मी चर्चेस तयार आहे. आज किंवा उद्यापर्यंत सरकारने चर्चेसाठी यावं. त्यानंतर चर्चा करणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आंदोलक सहकाऱ्यांच्या विनंती मान राखून जरांगे पाटील पाणी पिण्यास तयार
आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. मराठा आंदोलकांकडून अश्रू आनावर होत असल्याचे चित्र देखील पहायला मिळत आहे. दरम्यान मराठा आंदोलकर्त्यांकडून पाटील यांनी पाणी पिण्याची विनंती केली जात आहे. या एक आंदोलक पाटील यांना म्हणाले की, “दादा माझी एकच विनंती आहे. फक्त पाणी घ्या…आरक्षणाची आम्हाला गरज नाही. आमच्या मनगटात बळ आहे. फक्त दादा तुम्ही पाणी घ्या”, अशी विनंती मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आंदोलकांच्या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी एक घोट पाणी घेतले.
नेत्यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी एकत्र यावं
दिवसेंदिवस मराठा आरक्षण आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा देऊन उपोषणाला केलेल्या समर्थनावर ते म्हणाले की, “राजीनामा देण्यापेक्षा नेत्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळेल यासाठी काम करावे.”
31 ऑक्टोबरनंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा
मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितील मुदतवाढ दिल्यानंतर जरांगे पाटील पुढील आंदोलनाची दिशा २९ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. आज याबाबत बोलताना त्यांनी 31 ऑक्टोबरनंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार असल्याचे जाहीर केले. मग सरकारचा मार्ग अधिक खडतर होईल. सामुहिक उपोषणाला बसलेले लोक पाणी पिऊ शकतात. त्याचबरोबर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी सर्व पक्षांच्या आमदार, माजी आमदारांनी सरकारवर दबाव आणावा, असे जरांगे म्हणाले.