पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 106 व्या भागात देशवासियांसाठी ‘लोकल फॉर व्होकल’चा मंत्र दिला. दिवाळीचा सण काही दिवसांवर येत आहे. या सणासुदीच्या काळात ‘मेक इन इंडिया’ वस्तू खरेदी करून आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच 31 ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आहे. या दिवशी केवडिया, गुजरातमध्ये एक कार्यक्रम नक्कीच होणार आहे. तसेच ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत देशभरातून गोळा केलेल्या मातीने दिल्लीत अमृत वाटिका बांधण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली
या महिन्याच्या सुऊवातीला गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत खादीची विक्रमी विक्री झाली होती. इथे पॅनॉट प्लेसमध्ये एका खादीच्या दुकानात लोकांनी एकाच दिवसात दीड कोटी ऊपयांपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी केली. दहा वर्षांपूर्वी देशात खादी उत्पादनांची विक्री 30 हजार कोटींहून कमी होती, ती आता वाढून जवळपास 1.25 लाख कोटी ऊपये झाल्याची माहिती देताना आपल्याला अत्यानंद होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
स्वदेशी उत्पादने जरूर खरेदी करा!
पंतप्रधान म्हणाले, मित्रांनो आज मला तुम्हाला स्वदेशी वस्तूंसंबंधी आणखी एक विनंती आग्रहाने करायची आहे. तुम्ही जेव्हाही पर्यटन किंवा तीर्थयात्रेला जाल तेव्हा स्थानिक कलाकारांनी बनवलेली उत्पादने नक्कीच खरेदी करा. तुमच्या प्रवासाच्या बजेटचा जास्तीत जास्त भाग स्थानिक वस्तूंवर खर्च करा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. प्रत्येक सणाप्रमाणे या उत्सवातही स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या. देशवासीयांच्या घामाचा सुगंध असलेल्या वस्तूंनी आपले घर सजवा. व्होकल फॉर लोकल हे केवळ सणांपुरते मर्यादित नसावे. ही भावना केवळ दिवाळीपुरती मर्यादित राहू नये. आणि दिवाळीला फक्त सोशल मीडियासाठी दिवे खरेदी करू नका. अशी उत्पादने खरेदी करताना ‘युपीआय’द्वारे पैसे द्या. स्वदेशी वस्तू खरेदी करतानाचे सेल्फी घ्या आणि ते नमो अॅपवर शेअर करा, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
विजेत्यांचे मनोबल आणखी वाढवा
‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी लोकांना आपल्या आसपास राहणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या देशातील खेळाडू विविध स्पर्धांमध्ये झेंडा फडकवत आहे. अलीकडेच आशियाई खेळांनंतर पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. या खेळांमध्ये 111 पदके जिंकून भारतीयांनी इतिहास रचला आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की, या खेळात सहभागी झालेल्या किंवा विजयी झालेल्या मुलांसोबत काही क्षण निश्चितपणे व्यतित करा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ कार्यक्रमाचा समारोप
अलीकडेच देशातील प्रत्येक गावातून आणि प्रत्येक घरातून माती गोळा करण्याची विनंती करण्यात आली होती. देशाच्या विविध भागातून माती गोळा करून ती कलशात ठेवण्यात आली आणि त्यानंतर अमृत कलश यात्रा काढण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून गोळा केलेली ही माती हजारो अमृत कलश यात्रांच्या माध्यमातून आता दिल्लीत पोहोचली आहे. आता दिल्लीत ही माती एका विशाल भारत कलशात साठवून या पवित्र मातीने दिल्लीत ‘अमृत वाटिका’ बांधली जात आहे. यासंबंधीचा कार्यक्रम 31 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.