क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणार्या अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोहम्मद शमीच्या नावाची क्रीडा मंत्रालयाला शिफारस केली आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीची कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती. या कामगिरीमुळे त्याच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
मोहम्मह शमीची विश्वचषक स्पर्धेत दिमाखदार कामगिरी
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या साखळी सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यातून शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. त्याने केवळ सात सामन्यांमध्ये तब्बल २४ विकेट घेतल्या होत्या. तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज ठरला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत तीनवेळा ५ पेक्षा अधिक बळी घेण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर नोंदवला होता.याशिवाय त्याने विश्वचषकात सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रमही केला.
मोहम्मद शमी याने भारतीय क्रिकेट संघासाठी ६४ कसोटी, १०१ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २२९, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९५ आणि टी-२० क्रिकेटमध्ये २४ विकेट आहेत.