पहिली ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पेन (परमनंट एज्युकेशन नंबर) प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे. यू-डायस प्लसच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांला यंदाच्या शैक्षणिक वर्षात हा नंबर देण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक करियर डेटा एकत्रित मिळण्यास आता सोपे होणार आहे.
पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती यू- डायस प्लसच्या माध्यमातून दरवर्षी एकत्रित केली जाते. दरवर्षी या प्रणालीत नव्याने बदल केले जातात. सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यार्थीसंख्या, पायाभूत सुविधांची माहिती, विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सोई-सुविधा, शिक्षकसंख्या आणि पदे, रिक्त पदे आदी माहिती ऑनलाईन प्रणालीत एकत्रित केले जाते. सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती संगणकीकृत करत असताना यंदापासून विद्यार्थ्यांचे नवे प्रोफाइल तयार केले जात आहे. नव्याने आणि जुनी नोंदणी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला पेन नंबरही दिला जात आहे. विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, वर्ग, जनरल रजिस्टर नंबर, जन्म दिनांक, जात, दिव्यांगांचे प्रकार, आधार माहिती, आरोग्याचा तपशील तसेच शैक्षणिक प्रगतीचा आलेख आदी माहितीही यु-डायस प्लस सॉफ्टवेअरमध्ये शाळास्तरावरून अद्ययावत करण्यात येत आहे.
असे आहेत नोंदणी विद्यार्थी
पहिली ते पाचवी : ९०, ५७,४०९
सहावी ते आठवी : ५५,४५, ४५६
नववी ते दहावी : ३५, १८,८०७
अकरावी ते बारावी : २७,७४,७९९
या नंबरमुळे काय होणार…
विद्याथ्यनि शाळा बदलली तरी हा नंबर कायम असणार
एखादा विद्यार्थी कोणत्या शाळेत, कोणत्या वर्गात शिकत आहे ही माहिती तातडीने मिळणार
विद्यार्थी तपशील व शैक्षणिक प्रगतीचीही माहिती असणार
स्थलांतर विद्यार्थ्यांस नव्या शाळेत नोंदणी प्रोसेस तातडीने होणार
विद्यार्थ्यांची पटावर खोटी संख्या दाखविण्यास चाप बसणार
शाळाबाह्य झाल्यास शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणता येणार
विद्यार्थी शैक्षणिक रेकार्ड तातडीने तपासता येणार
१. पूर्वी स्टुडन्ट नॅशनल कोड नंबर दिला जात होता. आता ‘पेन’ हा ११ अंकी कोड नंबर विद्यार्थी नोंदणी केल्यानंतर तयार होतो. हा नंबर विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे.
२. भविष्यात आता विद्यार्थी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून देण्यात येत असलेल्या आयडी कार्डवरही हा नंबर येण्याची शक्यता आहे.
३. राज्य मंडळासह केंद्रीय विद्यालय, सीआयएसईएस, सीबीएसई, आयबी, आयसीएसई आदी सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना हा नंबर दिला जाणार आहे.