रेशन धान्य दुकानातून आणलेल्या गहू खाल्याने दोन बोकडांचा मृत्यू झाल्याची, अजब घटना येथील कृष्णा नगर येथे घडली आहे. या गहुमध्ये युरिया सदृश्य रासायनिक पदार्थ मिसळण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान संबंधित दुकानदाराने संदेश पाठवून सदरचे धान्य परत आणून देण्याचा आवाहन केलं होतं. मात्र नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असल्याचा सांगत बोकड मालक मेहबूब मुजावर यांनी थेट शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या खळबळजनक घटनेने स्वस्त धान्यात युरिया आलाच कसा?असा प्रश्न उपस्थित होतोय. यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मेहबूब आबालाल मुजावर राहणार कृष्णा नगर गल्ली नंबर 4 हे केसरी शिधापत्रिकाधारक आहेत. सोमवारी सकाळी मुजावर यांनी शहापुरातील कल्पवृक्ष कॉलनीत असलेल्या रेशन दुकानातून धान्य आणलं होतं. त्यातील गहू मुजावर यांनी घरासमोरच दारात वाळण्यासाठी पसरून ठेवला होता. दरम्यान मुजावर यांच्याच मालकीची सहा महिन्याची दोन बोकडांनी हा वाळत घातलेला खाऊ खाल्ला. त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटातच दोन्ही बोकड तडफडु लागली बोकडांची अशी अवस्था पाहून मुजावर यांनी तात्काळ जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून घेतलं. मात्र डॉक्टर येण्यापूर्वी दोन्ही बोकडांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी बोकडाने खाल्लेल्या गहु च निरीक्षण केला असता त्यामध्ये त्यांना युरिया सदृश्य रासायनिक पदार्थ आढळून आला. त्यावरून त्यांनी युरिया मिश्रित गहू खाल्ल्याने बोकडांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला. या घटनेनंतर मेहबूब मुजावर व नातेवाईकांनी संबंधित रेशन दुकानदाराला बोलवून घटनेची माहिती दिली त्यावर दुकानदारांनी वरूनच धान्य आले असून ही घटना वरिष्ठ कार्यालयात कळवतो असे सांगितले आहे.मात्र या घटनेन मुजावर कुटुंबाचे सुमारे 25000 रुपयांचे नुकसान झाल्यान त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच कोल्हापुरातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.