अयोध्येतील श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. एकूण 7 हजार जणांना निमंत्रणे पाठवली जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह 3 हजार व्हीव्हीआयपींची नावे आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेत्री कंगना राणावत, अक्षय कुमार, गायिका आशा भोसले यांचीही नावे या यादीत आहेत. देशभरातील 4 हजार संत-माहात्म्यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे.
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित व्यक्तींनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या स्वाक्षरीनिशी या निमंत्रणपत्रिका रवाना झाल्या आहेत. व्हीव्हीआयपींना बारकोड पासद्वारे प्रवेश मिळणार आहे.
मूर्तींचे काम 90 टक्के
रामलल्लांच्या मूर्तीचे काम 90 टक्के आटोपलेले आहे. रामलल्लांना 5 वर्षांच्या मुलाच्या रूपात विराजमान केले जाईल. दोन दगडांपासून एकूण 3 मूर्ती तयार केल्या जात आहेत. त्यापैकी एका मूर्तीची निवड होईल.
4 लाख मंदिरांतून सोहळा
देशभरातील 4 लाख गावांतील मंदिरांमध्येही हा सोहळा साजरा केला जाणार आहे. या मंदिरांमध्ये रामनाम संकीर्तन होणार आहे. प्रसादवाटप केले जाईल.
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
अयोध्येतील मुख्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही होणार आहे. यामुळे कोट्यवधी भाविकांना हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष पाहता येणार आहे.