Logo
राजकारण

आता १२ राज्‍यांमध्‍ये भाजपची स्‍वबळावर सत्ता!, जाणून घ्‍या राज्‍यनिहाय 'सत्ता'कारण

नुकत्‍याच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेल्‍या पाच राज्‍यांपैकी चार राज्‍यांचे निकाल रविवार, ३ डिसेंबर रोजी जाहीर झाले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्‍याने आता भाजपने स्‍वबळावर १२ राज्‍यातील सत्ता काबीज केली आहे. तर काँग्रेसकडे स्‍वबळावर केवळ तीन राज्‍ये आहेत.पाच राज्‍यांतील विधानसभा निवडणुकीनंतर आता कोणत्‍या राज्‍यात कोणत्‍या पक्षाचे सरकार आहे हे जाणून घेवूया… भाजप १२ राज्‍यांत स्‍वबळावर तर ४ ठिकाणी भाजप आघाडीचे सरकार २०१४ मध्‍ये भाजपने केंद्रात सरकार स्‍थापन केले. यानंतर देशाच्‍या राजकीय नकाशा झपाट्याने बदलत राहिला आहे. आज देशातील २८ राज्‍यांपैकी आणि विधानसभा असलेल्‍या दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी तब्‍बल १६ ठिकाणी एक तर स्‍वबळावर किंवा मित्रपक्षांसह सत्तेवर आहे. ( BJP now has 12 states) उत्तर भारत आणि ईशान्‍य भारतात भाजपचे वर्चस्‍व दिसत आहे. मात्र दक्षिण भारतातील एकाही राज्‍य भाजपला जिंकता आलेले नाही. काँग्रेसचा विचार करता आता प्रमुख विरोधी पक्ष असणार्‍या काँग्रेसची आता केवळ तीन राज्‍यांमध्‍येच स्‍वबळावर सत्तेत असून, दोन राज्‍यांत या पक्षाला मित्रपक्षाबरोबर आघाडीमुळे सत्तेत स्‍थान मिळाले आहे. विशेष म्हणजे ८ राज्ये अशी आहेत जिथे भाजप किंवा काँग्रेस दोघांनाही सत्तेत वाटा मिळालेला नाही. तिथे स्थानिक पक्षांचाच वरचष्मा आहे. भाजपचे सरकार १६ राज्‍यांमध्‍ये आता गोवा, गुजरात, मध्‍य प्रदेश, राजस्‍थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर या १२ राज्‍यांमध्‍ये भाजप स्‍वबळावर सत्तेत आले आहे. तर महाराष्ट्र, नागालँड, सिक्कीम आणि मेघालय या चार राज्यांमध्ये भाजपची अन्‍य पक्षांच्‍या आघाडी सरकार सत्तेत आहे. काँग्रेस केवळ तीन राज्‍यांमध्‍ये स्‍वबळावर हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्‍यांमध्‍ये काँग्रेस स्‍वबळावर सत्तेत आहे. तर झारखंड आणि बिहारमध्‍ये अन्‍य पक्षांबरोबरील आघाडी सरकारमध्‍ये काँग्रेसचा समावेश आहे. भाजप शासित प्रदेशांनी भारताच्या 58 टक्के भूभाग तर 57 टक्के लोकसंख्या व्‍यापली आहे. तर , काँग्रेस शासित राज्ये देशाच्या 41 टक्के भूभागासह 43 टक्के लोकसंख्या व्यापतात. ‘या’ राज्‍यामंध्‍ये स्‍थानिक पक्षांचा वरचष्‍मा देशातील आठ राज्‍यांमध्‍ये स्‍थानिक पक्षांचाच वरचष्‍मा आहे. राज्‍य आणि कंसात सत्ताधारी पक्ष पुढीलप्रमाणे : पश्‍चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस), तामिळनाडू (द्रमुक), केरळ ( लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट), आंध्र प्रदेश (वायएसआर काँग्रेस पार्टी ), मिझोराम ( मतमोजणी सुरु स्‍थानिक आघाडी ‘झेडपीएम’ची सत्तेकडे वाटचाल), पंजाब (आम आदमी पार्टी ), दिल्‍ली (आम आदमी पार्टी ), ओडिशा ( बिजू जनता दल- बीजेडी)