Logo
राजकारण

ओबीसींचे २० जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नाही. पण राज्य सरकारने ओबीसीमधून आरक्षण देऊ नये व जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी राज्यातील ओबीसी समाजाकडून मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात 20 जानेवारीपासून आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. मुंबई व त्यालगत असलेल्या भागात धनगर, वंजारी, आगरी, कोळी, भंडारी समाज अशी सुमारे 50 लाख ओबीसींची लोकसंख्या आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाला वाहनामधून ओबीसी समाज बांधव येणार नाहीत. ते पायी चालत दिंडी करत याठिकाणी येतील, असे शेंडे यांनी सांगितले. यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत 20 जानेवारीपासून जरांगे यांनी उपोषण जाहीर केले आहे. त्यांच्या उपोषणासाठी 10 लाख वाहने मुंबईला येणार, असे ते सांगत आहे तर इतक्या श्रीमंत लोकांना आरक्षणाची गरज काय? मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नसून तो सरकारला आहे. त्यांना यापूर्वी ईडब्ल्यूएस (आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल प्रवर्ग) मधून घटनात्मक 10 टक्के आरक्षण दिले आहे. या 10 टक्केपैकी साडेआठ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणात वाढ करावी. पण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण नको, ही आमची भूमिका आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची संपूर्ण नियुक्ती प्रक्रिया चुकीची आहे. सरकारने हा आयोग हायजॅक केला आहे. या आयोगाविरोधात न्यायालयात आव्हान देणार आहे. राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, कुणबी दाखले रद्द करावे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. असेच अधिवेशन ओबीसी व इतर समाजासाठी का घेत नाही, असा भेदभाव सरकार का करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत विशेष अधिवेशन हे सर्वांसाठी बोलवावे, असे आवाहन शेंडगे यांनी केले.