अभूतपूर्व मंदीचे वातावरण असले तरी आज यंत्रमाग मालक आणि कामगार यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध आज बोनसच्या निमित्ताने अधिक घट्ट झाले. साधे यंत्रमाग आणि अॅटोलूम कारखान्यातील कामगारांच्या हातात बोनसच्या माध्यमातून सुमारे ७० कोटी रुपये पडले. त्यामुळे कामगारांची दिवाळी अधिक गोड होणार असून पुढील दोन दिवसांत शहरातील दिवाळी बाजार खरेदीला उधाण येणार आहे.
काही वर्षांपासून वस्त्रोद्योगात मोठी मंदी आहे. सूत व कापूस दरातील अस्थिरतेमळे कापडाला मागणी व दर आलेला नाही. त्यामुळे वस्त्रोद्योगात अस्वस्थता आहे. दुसरीकडे प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारा दिवाळी सण आला आहे. समाजातील बहुतांश घटक दिवाळी साजरी करण्यात गुंतला आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या हातात बोनस पडल्यामुळे खरेदीसाठी वर्दळ वाढत आहे; पण यंत्रमाग कामगारांच्या हातात बोनस पडल्यानंतर वस्त्रोद्योगात खऱ्या अर्थाने दिवाळी खरेदीला बहर येतो.
यंत्रमाग कामगारांचा दर शुक्रवारी, तर अॅटोलूम कारखान्यातील कामगारांचा पगार महिन्याला होत असतो. बोनसचे वाटप दिवाळीच्या अगोदर येणाऱ्या शुक्रवारी होते. त्यानुसार मंदीचे वातावरण असतानाही यंत्रमाग मालकांनी कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी ठरल्याप्रमाणे बोनसचे वाटप आज केले. अपवाद वगळता सर्वच कारखान्यांतील कामगारांच्या हातात आज बोनसची रक्कम पडली. साध्या यंत्रमाग कामगाराला १६.६६ टक्के याप्रमाणे २२ ते २५ हजार रुपये, तर अॅटोलूम कामगारांना ८.३३ टक्के याप्रमाणे २२ ते ४० हजारांपर्यंत बोनस मिळाला आहे.
साधारणपणे शहरात साध्या यंत्रमागावर सुमारे १७ हजार कामगार काम करतात. अॅटोलूम क्षेत्रात ८ हजार कामगार कार्यरत आहेत. त्यांना दिवाळी बोनस मिळाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शहरात दिवाळी खरेदीला जोर येणार आहे. यातून दिवाळी बाजारातील मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित असून काही अंशी तरी मंदीचे वातावरण दूर होण्यास मदत होणार आहे.