कंत्राटी कामगारांना एस.टी (S.T) सेवेत, कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्यात यावे. या मागणीसाठी आज (दि.१०) कोल्हापूरात कर्मचाऱ्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर बसून हे ‘भीक मांगो’ आंदोलन केले आहे. आंदोलनात राज्यभरातील कंत्राटी भरती करण्यात आलेले एस.टी कर्मचारी सहभागी होते. यावेळी कंत्राटी एसटी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना भेटून त्यांच्या मागणीचे निवेदन दिले. ‘कोरोना आणि एसटी संप काळातील कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना S.T सेवेत कायम करण्यात यावे’ अशी मागणी आंदोलकांकडून निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोरोना आणि एसटी संप काळात एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करून घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना सेवेतून कमी करण्यात आले. दरम्यान या काळात काही कामगारांनी स्वत:च्या नोकऱ्या सोडून एसटी महामंडळाच्या नोकरीत दाखल झाले होते. आता त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी म्हणून भरती करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमचे समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी एसटी कर्मचाऱ्यांनी आज कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळी S.T प्रशासनाला दिला.