वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेकदा त्याची पूर्वकल्पना नसल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी तसेच वीज देयके व इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आता ग्राहकांना मोबाईलवरच उपलब्ध होणार आहे.
वीज जाणार असेल, तर याची ग्राहकांना मिळणार पूर्वसूचना असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. ग्राहकांना सूचना मिळविण्यासाठी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे. ग्राहकांना आता वीज देयकासोबतच वीजजोडणी, डिमांड भरणे, मीटर रीडिंग पाठविणे, वीज बिल बघणे यात वेळ वाचेल तसेच महावितरणच्या विविध सेवांची माहिती व ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी महावितरणकडून टोल फ्री सेवा असून, नोंदणी केलेल्या क्रमांकावरून तक्रारही करता येणार आहे.रामटेक येथील महावितरण विभागाचे उपविभागीय अभियंते भारत बालपांडे म्हणाले की महावितरणच्या विविध सोयीसुविधांची माहिती ग्राहकांना मोबाईलवर दिली जाते. यामध्ये त्यांना त्यांचे वीजबिल, तसेच त्यांच्या भागातील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची माहितीही दिली जाते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी नोंदणी केली नाही, त्यांनीही नोंदणी करून घ्यावी.
मोबाईल क्रमांक कसा नोंदवाल?
ज्या ग्राहकांनी मोबाईलची नोंदणी केली नाही त्यांनी एमआरईजी टाइप करून ९९३०३९९३०९ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावर किंवा ४२१८३००६०८०० या क्रमांकावर नोंदणी करता येते.सत्तेचाळीस हजार पाचशे ग्राहकांची मोबाईल नोंदणी
रामटेक तालुक्यात महावितरणच्या घरगुती, वाणिज्यक तसेच औद्योगिक क्षेत्रातील जवळपास सात लाख ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली. या ग्राहकांना एसएमएसद्वारे वीजबिलाची माहिती तसेच वीजपुरवठा कधी आणि किती तास जाईल याची माहिती दिली जाते.
एसएमएसद्वारे मिळणार सुविधा
महावितरणमध्ये ज्या ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. अशा नागरिकांना वीजबिल येण्याआधीच एसएमएसच्या आधारे वीजबिलाची माहिती मोबाईलवर मिळत आहे. ज्या ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक महावितरणमध्ये जाऊन नोंदविला आहे. अशांना संपूर्ण माहितीही एसएमएसवर देण्यात येत आहे.