भारतातील कृषी निर्यात क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. सध्या देशाने कृषी निर्यातीने अंदाजे 50 अब्ज डॉलर्सचा आकडा ओलांडला आहे. आता 2030 पर्यंत देशातून कृषी निर्यात दुप्पट होईल आणि ती 100 अब्जचा टप्पा ओलांडेल अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
कृषी निर्यातीने गाठला 50 अब्ज डॉलर्सचा आकडा
केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी सांगितले की, देशातून कृषी उत्पादने आणि सेवांची निर्यात वेगाने वाढत आहे. सध्या निर्यातीने 50 अब्ज डॉलर्सचा आकडा गाठला आहे. येत्या 6 वर्षात, म्हणजे 2030 पर्यंत हा आकडा 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. 2030 पर्यंत देशातून वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचे लक्ष्य 2 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कृषी निर्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
रेडी टू ईट फूड विभागात विकासासाठी प्रचंड वाव
दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फूड अँड बेव्हरेज शो इंडस फूड 2024 मध्ये सुनील बर्थवाल यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते म्हणाले की, भारतातील रेडी टू फूड सेगमेंटमध्ये प्रगतीला मोठा वाव आहे. भारतीय उत्पादने आणि सेवा हव्या असलेल्या देशांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्यांनी काम करावे.
तांदूळ, गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदीचा कोणताही परिणाम नाही
या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की चालू आर्थिक वर्षात देशाची कृषी निर्यात 53 अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचेल. तांदूळ, गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी असली तरी निर्यातीत कोणतीही घट होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या बंदीमुळे निर्यातीत सुमारे 5 अब्ज डॉलर्सची घट होण्याची भीती यापूर्वी व्यक्त केली जात होती.
80 हून अधिक रिटेल कंपन्यांचा सहभाग
यावेळी बोलताना ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला म्हणाले की, या तीन दिवसीय शोमध्ये सुमारे 90 देशांतील 1200 प्रदर्शक आणि 7500 खरेदीदार सहभागी होत आहेत. तसेच 80 हून अधिक रिटेल कंपन्या या शोचा भाग बनल्या आहेत. यामध्ये कॅरेफोर, खिमजी रामदास, ग्रँड हायपरमार्केट, नेस्टो, मुस्तफा, लुलू आणि स्पार यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.