Logo
राजकारण

मुख्यमंत्री लागले लोकसभेच्या तयारीला; मित्र पक्षांसोबत घेतली महत्वाची बैठक!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील समन्वय अधिक वाढायला हवा अशी अपेक्षा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली. राज्यातील महायुती सरकार मधील शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही प्रमुख घटकपक्षांची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला तिन्ही प्रमुख घटक पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक आज वर्षा बंगल्यावर पार पडली. यात सर्वप्रथम बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलन आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तिन्ही घटक पक्षातील समन्वय अधिक वाढवा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरक्षण बैठकीत बोलताना मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने नक्की काय पावले उचलली आहेत त्याची माहिती दिली. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असताना आपण वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले.आरक्षण मिळण्याबाबत येणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी त्याना समजावून सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी माजी न्यायाधीश तसेच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी त्याना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. तसेच राज्यातील मराठा आंदोलनादरम्यान जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांनी दौरे करावेत मराठा आंदोलन आणि इथून पुढे लोकसभा निवडणुकीपर्यंत या तिन्ही पक्षामधील समन्वय अधिक वाढवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच सरकारने घेतलेले निर्णय आणि नवीन प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मंत्री आणि आमदारांनी दौरे करावेत. गाव पातळीवर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवा यासाठी प्रयत्न करावेत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.