Logo
ताज्या बातम्या

आता आजी-आजोबांचीही होणार परीक्षा! जाणून घ्या काय आहे उपक्रम?

केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी १७ मार्च रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात होणार आहे. राज्यभरात ६ लाख २० हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्रशासनाकडे झाली असून त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्या तरी त्यामुळे नातवंडांसह आजी आजोबाही अभ्यासात सध्या मग्न असल्याचे चित्र आहे. (Exam) उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून २०२२ ते २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, आदी बाबींचा समावेश आहे. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणून देशातील १५वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसीत करता येतील. त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालये / विभागांच्या सहाय्याने केली जात आहे. महाराष्ट्र राज्याने दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासननिर्णयाद्वारे ही योजना स्वीकारली आहे. त्यानुसार २५ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी साठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास् तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ज्या शाळेतून उल्लास पवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. नोंदणीकृत असक्षरांची रविवारी (१७ मार्च) रोजी त्या शाळेमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. तसेच सदर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना) कडून करण्यात आले आहे. केंद्राचे निरीक्षक अवर सचिव प्रदीप हेडाऊ या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारीही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत. Exam : अशी होणार परीक्षा.. प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित पुढील तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण १५० गुणांची आहे. वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुण असे आहेत. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता मिळू शकतील. परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता मिळणार नाहीत. परीक्षेची वेळ परीक्षेची वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल. (दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ) परीक्षार्थी सदर परीक्षेसाठी वरील कालावधीत कधीही येता येणार आहे. ६,२१,४६२ इतक्या असाक्षरांची नोंद उल्लास पवर ऑनलाईन पध्दतीने झालेली आहे. उल्लास पवर नोंदणीकृत सर्व असाक्षरांची परीक्षा घेण्याबाबत जिल्हयांना सूचना शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर आपल्या सवडीने स्वतःचे ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.