देशातील बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट रोखणे आणि रुग्णावर उपचार करीत असलेल्या डॉक्टरांची परिपूर्ण माहिती रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांना उपलब्ध व्हावी, यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आयोगामार्फत देशातील सर्व अधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांची एक नोंदणी सूची तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. याचा पथदर्शी प्रकल्प सहा महिन्यांत कार्यान्वित होईल आणि 2024 अखेर देशात संपूर्ण सूची जनतेला उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशात वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी आणि व्यवसायाचा परवाना यासाठी अधिनियम तयार केले आहेत. मे 2023 मध्ये जाहीर केलेल्या या अधिनियमातील तरतुदीनुसार वैद्यकीय व्यावसायिकांची सूची तयार केली जात आहे. यानुसार देशातील प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे शैक्षणिक अर्हता, जेथून शिक्षण घेतले त्या संस्थेचे नाव, प्रमाणपत्रे, व्यवसायाचे ठिकाण आदी आवश्यक सर्व माहितीची नोंदणी आयोगाकडे करावी लागणार आहे.
यानंतर आयोगामार्फत संस्थेच्या वेबसाईटवर ही माहिती खुली करण्यात येईल. सॉफ्टवेअरच्या आधाराने बनविलेल्या या सूची अंतर्गत रुग्णाला उपचाराचे ठिकाण आणि डॉक्टरांचे नाव टाकल्यानंतर त्याची सर्व माहिती एका क्षणात उपलब्ध होणार आहे. देशात सध्या 14 लाख वैद्यकीय व्यावसायिकांची इंडियन मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी आहे. हा संपूर्ण डाटा आयोगाकडे हस्तांतरित केला जाणार आहे. यामुळे ज्यांनी इंडियन मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी केली आहे, अशा व्यावसायिकांना फेरनोंदणीची गरज नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
खरे डॉक्टर कोण? यावर भर
देशातील वैद्यकीय व्यवसायामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखल होत असतानाच बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट हाही एक चिंतेचा विषय बनला आहे. बोगस प्रमाणपत्राआधारे हे व्यावसायिक राजरोसपणे व्यवसाय करतात. रुग्णांवर उपचार करतात आणि अघटित घटना घडली की पलायन करतात. यामध्ये रुग्णाचा हकनाक जीव जातो. अशा बोगस डॉक्टरांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीमही राबविण्यात आली. परंतु, आता खरे डॉक्टर कोण? या संकल्पनेवर आयोगाने भर दिला आहे.,