लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार पाच दिवसांत लागू होण्याची शक्यता असून, मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक होणार असून, त्यामध्ये विविध लोकप्रिय निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारला अनेक निर्णय घ्यायचे आहेत. याशिवाय आमदारांच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित निर्णयही मार्गी लावायचे आहेत. यामुळे सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीचे अनुभव पाहता निवडणुकीपूर्वी होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातात. त्यामुळे या दोन दिवसांत देखील निर्णयांचा पाऊस पाडून राज्य सरकार राज्यातील जनतेला खूश करण्याचे प्रयत्न करेल, हे निश्चित मानले जाते.
याशिवाय गेल्या काही दिवसांत सरकारने घेतलेल्या निर्णयांचे आदेश काढण्यासाठीही मंत्रालयात धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्या मंत्रालयात मंत्री कार्यालये आणि मुख्यमंत्री कार्यालयात अभ्यागतांची गर्दी वाढली आहे. आचारसंहिता लागू झाली तर कामे रखडतील म्हणून सर्वच जण प्रयत्नशील आहेत.
मंत्र्यांनी आपल्याकडील फायली क्लीअर करण्याचा सपाटा लावला आहे. या फायलींच्या माध्यमातून लोकांना खूश करतानाच त्यांनी निवडणुकीसाठी पक्षनिधी जमविण्यावर भर दिला असल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात आहे. पक्षनिधीच्या नावाने काही मंत्री
स्वतः चेही चांगभलं करीत असल्याची कुजबुज आहे. अनेक मंत्र्यांनी वैयक्तिक लाभाच्या अनेक फायली या महिनाभरात हातावेगळ्या केल्या आहेत. अनेक रखडलेल्या फायलींना या काळात पाय फुटले आहेत. आणखी चार पाच दिवस फायलींची फिरवाफिरवी आणि त्यावर कोंबडे मारण्याची सुरू असलेली लगबग वाढेल, असे दिसत आहे.