पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘क्रिएट ऑन इंडिया’ सुरू करण्यास आणि भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरांना प्रोत्साहन देऊन भारताची यशकथा जगासोबत शेअर करण्याचे आवाहन कंटेट क्रिएटर्सना केले. भारत मंडपम् येथे पहिले नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड प्रदान केल्यानंतर पंतप्रधानांनी ही मोहीम लाँच केली. यावेळी मोदी यांनी ‘आपण भारताबद्दल सामग्री निर्मिती करू या, जगासाठी निर्मिती करू या,’ अशी घोषणाही दिली.
ही तर १४० कोटी भारतीयांची हमी...
निवडणुका तोंडावर आल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘शक्य झाल्यास पुढच्या शिवरात्रीला मी तुम्हाला हमी देतो की... असाच कार्यक्रम मी आयोजित करेन.’ यावेळी प्रेक्षकांनी ‘अब की बार ४०० पार’ अशा घोषणा दिल्या. त्यावर पंतप्रधान म्हणाले की, “ही मोदींची हमी नाही, तर १४० कोटी भारतीयांची हमी आहे.”
२० श्रेणींत २३ विजेते...
राष्ट्रीय सर्जक पुरस्काराच्या पहिल्या फेरीत २० विविध श्रेणींमध्ये १.५ लाखांहून अधिक नामांकने प्राप्त झाली. त्यानंतर, मतदान फेरीत विविध पुरस्कार श्रेणींमध्ये डिजिटल इनिशिएटर्ससाठी सुमारे १० लाख मते पडली. त्यानंतर, तीन आंतरराष्ट्रीय सामग्री निर्मात्यांसह २३ विजेते निश्चित झाले.