Logo
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौर्‍यात उमेदवारीचा तिढा सुटणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि.८) कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची निश्चिती होण्याची शक्यता आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे गटात आहेत. महायुतीच्या जागा वाटपात भाजप 36, शिवसेना शिंदे 8 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार असे जागावाटप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 13 खासदार शिंदे यांच्या समवेत राहिले आहेत. या सर्व खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. जागावाटपाच्या अंतिम चर्चा दिल्लीतच महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. जागावाटपाच्या अंतिम चर्चा दिल्लीत होणार आहेत. दिल्लीतून शिंदे गटाच्या चार खासदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखविले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांमध्ये अस्वस्थता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दि. 9 मार्च रोजी अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील दोन जागांपैकी एक जागा भाजपला हवी दरम्यान, या अस्वस्थतेतून शिंदे गटाचे काही खासदार भाजपच्या कमळ चिन्हावर लढावे आणि आपली खासदारकी कायम ठेवावी या विचारात आहेत. कोल्हापुरातील दोन जागांपैकी एक जागा भाजपला हवी आहे. भाजप जर लढणार असेल तर आपणच भाजपच्या चिन्हावर का लढू नये, असा विचार या खासदारांमध्ये सुरू आहे. या अस्वस्थतेची दखल शिंदे यांनी घेतली असून उद्याच्या त्यांच्या दौर्‍यात याबाबत उमेदवारांना आश्वस्त केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या कोल्हापूर दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.