हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे लाेकार्पण सोमवारी (दि.४) होणार आहे. महामार्गाचा तिसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला होत असल्याने राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर कमी वेळेत कापता येणार आहे.
समृद्धी महामार्गावर भरवीर ते इगतपुरीदरम्यान तिसरा टप्पा आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हा टप्पा जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. मौजे नांदगाव सदो येथील इगतपुरी पथकर प्लाझा येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ ला पार पडले. त्यावेळी नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५०१ किलोमीटर टप्पा जनतेसाठी खुला करण्यात आला. मे २०२३ मध्ये शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण पार पडले. त्यानंतर भरवीर ते इगतपुरी हा तिसरा टप्पाही वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी १ हजार ७८ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, लोकार्पणानंतर ७०१ किलोमीटरपैकी एकूण ६२५ किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखीन कमी वेळेत मुंबई गाठणे शक्य होणार आहे.
असा आहे तिसरा टप्पा
समृद्धीच्या तिसऱ्या टप्प्यात इगतपुरी तालुक्यातील २४.८७२ किमीचा मार्ग असून, १६ गावांतून जाताे. पॅकेज १३ अंतर्गत २३.२५१ किमी व पॅकेज १४ अंतर्गत १.६२१ किमी लांबीचा समावेश आहे. या टप्प्यात पॅकेज १३ अंतर्गत १ व्हाया डक्ट (२०० मी. लांबी), दारणा नदीवरील १ मोठा पूल (४५० मी.), ८ छोटे पूल, वाहनांसाठी ५ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ८ भुयारी मार्ग, ९ ओव्हरपास, पथकर प्लाझावरील ४ इंटरचेंज, १४ टोल बूथ, २ वे-ब्रिज, १ टनेल- २७५ मी., २७ बॉक्स कल्वर्ट, २७ युटीलिटी डक्ट व पॅकेज १४ अंतर्गत १ व्हाया डक्ट (९१० मी. लांबी) आदी सुविधांचा समावेश आहे. दरम्यान, महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर आहे.