Logo
ताज्या बातम्या

ED चे समन्स बेकायदेशीर, तरीही १२ मार्चनंतर उत्तर देण्यास तयार : केजरीवाल

मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ८ समन्स बजावल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) उत्तर दिले आहे. मला बजावण्यात आलेले समन्स बेकायदेशीर आहेत. तरीही मी ईडीच्या प्रश्नांना उत्तर देण्यास तयार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाला कळवले आहे की ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीसाठी त्यांच्यासमोर हजर राहण्यास तयार आहेत. त्यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी १२ मार्चनंतरची तारीख मागितली आहे. ईडीने केजरीवाल यांना नुकतेच आठवे समन्स बजावले होते. त्यांना ४ मार्च (सोमवारी) रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पण, केजरीवाल यांनी समन्स टाळण्याचा निर्णय घेतला. कारण दिल्ली सरकार आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. ईडीला दिलेल्या उत्तरात, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे आणि त्यांना जारी केलेले समन्स “बेकायदेशीर” असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. २६ फेब्रुवारी रोजी, केजरीवाल यांनी ईडीचे सातवे समन्स टाळले होते. यावर AAP ने सांगितले होते की हे प्रकरण “न्यायालयात प्रलंबित आहे” आणि त्यावर १६ मार्च रोजी सुनावणी होईल. वारंवार समन्स बजावण्याऐवजी ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी, असे आवाहन आपने केले होते. केजरीवाल यांना २ मार्च रोजी आठवे समन्स बजावले होते. या व्यतिरिक्त यापूर्वी त्यांना २६ फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २ फेब्रुवारी, १८ जानेवारी, ३ जानेवारी, २२ डिसेंबर २०२३ आणि २ नोव्हेंबर २०२३ रोजी समन्स बजावण्यात आले होते.