भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याकरीता उच्च पातळीवर चर्चेला प्रारंभ केला आहे. गुरुवारी मध्यरात्री साडेतीन वाजेपर्यंत, चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी पाच सदस्यांची निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही चर्चा झाली. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारांची पहिली यादी घोषित केली जाण्याची शक्यता आहे. या यादीत 125 हून अधिक नावे असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत 16 राज्यांचा आढावा घेण्यात आला आहे.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी 16 राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, उत्तराखंड आदी राज्यांसंबंधी विचार करण्यात आला आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (वाराणसी), अमित शहा (गांधीनगर), राजनाथ सिंग (लखनौ) आदी नेत्यांची नावे असू शकतात. केंद्रीय मंत्रिमंडळात असणाऱ्या काही राज्यसभा सदस्यांनाही यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात आणण्याची भारतीय जनता पक्षाची योजना आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार अत्यंत सावधानतेने निवडला जाणार आहे. जिंकण्याच्या क्षमतेसोबतच उमेदवाराच्या जनमानसातील प्रतिमेलाही महत्व मिळणार आहे.
मित्रपक्षांसाठी जागा सोडणार
भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोकदल हा पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्षही विरोधी आघाडीतून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आला आहे. कर्नाटकात निधर्मी जनता दला हा देवेगौडा यांच्या नेतृत्वातील पक्षाने भारतीय जनता पक्षाशी युती केली आहे. या मित्रपक्षांना जागा सोडण्यासंबंधी विचारही बैठकीत करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सर्वात महत्वाचा
उत्तर प्रदेश हे राज्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आहे. या राज्यात लोकसभेच्या 80 जागा आहेत. या 80 जागांपैकी 6 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा भारतीय जनता पक्षाचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय इतर राज्यांमधील मित्रपक्षांनाही जागा सोडण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे. गुरुवारच्या बैठकीत अनेक जागांसंबंधी विचार करण्यात आला असला, तरी प्रथम सूचीत या सर्व जागांचा समावेश असणार नाही. टप्प्याटप्प्याने उमेदवारांची नावे घोषित होणार आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
संभाव्य राज्यसभा सदस्य
सध्या राज्यसभेचे सदस्य असणारे राजीव चंद्रशेखर, भूपेंदर यादव, मनसुख मांडविया, धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंदिया आणि पुरुषोत्तम रुपाला या केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात आणण्यात येऊ शकते. राजीव चंद्रशेखर यांना केरळमधील थिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्याविरोधात उभे करण्यावर विचार होत आहे. तसेच मध्यप्रदेशातील नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांना ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.